केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला आहे. "भावोजी आले तर तिवारीजी सांगत आहेत की, घराचे कागदपत्र लपवून ठेवा, कारण भावोजींची नजर त्याच्यावर आहे" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
रॉबर्ट वाड्रा यांच्यावर निशाणा साधत स्मृती इराणी म्हणाल्या की, "तिवारीजी म्हणत आहेत की तुम्ही घराचे कागदपत्र लपवून ठेवा, कारण भावोजींची नजर त्याच्यावर आहे. आज इथे ट्रॉमा सेंटर बांधले गेले असेल तर ते मोदींमुळेच झाले आहे. मोदी सरकारमध्ये मला दिल्लीत पाठवल्यानंतर मी अमेठीमध्ये एक लाखाहून अधिक घरं बांधली आहेत. जे काम आपण पाच वर्षात केले, ज्यात दोन वर्षे कोरोनामध्ये गेली, जे काम तीन वर्षात झाले ते काम गेल्या 15 वर्षात झाले नाही."
"सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांची इच्छा असती तर ते गरिबांच्या घरी नळाचं पाणी, घरं इत्यादी सुविधा देऊ शकले नसते का?. काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे की ते प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचा हिशोब करतील, मग प्रत्येकाची मालमत्ता घ्या आणि ज्याला वाटेल त्यांना वाटून द्या. आपल्याला माहिती आहे की, काँग्रेसचे लोक जेव्हा एकदा संपत्ती घेतात तेव्हा ते फक्त स्वत:चे खिसे भरतात" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
अमेठी लोकसभा जागेसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या जागेवर भाजपाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तिकीट दिलं आहे. मात्र, या जागेवर काँग्रेसने अद्याप उमेदवार दिलेला नाही.