Narendra Modi : "मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:26 PM2024-04-23T13:26:21+5:302024-04-23T13:32:19+5:30
Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेव्हा-जेव्हा आपण विभागलो तेव्हा शत्रूचा फायदा झाला. काँग्रेसची सत्ता असती तर रोज स्फोट झाले असते, OROP लागू झाली नसती. काँग्रेसच्या राजवटीत विश्वास टिकवणे कठीण आहे. काँग्रेसने रामनवमीला बंदी घातली. कर्नाटकात हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे मारहाण करण्यात आली असं मोदींनी म्हटलं आहे.
राजस्थानमधील टोंक येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, "मला तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि उत्साह मिळाला आहे. आज रामभक्त हनुमानजींच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे, संपूर्ण देशाला शुभेच्छा. हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा... एकता ही राजस्थानची सर्वात मोठी संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा आपली फाळणी झाली, त्याचा फायदा देशाच्या शत्रूंनी घेतला आहे. आताही राजस्थान आणि तेथील लोकांमध्ये फूट पाडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, राजस्थानने यापासून सावध राहण्याची गरज आहे."
"2014 मध्ये तुम्ही मोदींना दिल्लीत सेवेची संधी दिली तेव्हा देशाने असे निर्णय घेतले ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण 2014 नंतरही आणि आजही काँग्रेस दिल्लीत राहिली असती तर काय झाले असते? काँग्रेस असती तर आजही जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती आणि काँग्रेस सरकारने काहीच केलं नसतं. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू झाली नाही, देशाच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट होत राहिले असते. काँग्रेस असती तर भ्रष्टाचाराचे नवे मार्ग शोधले असते."
"परवा राजस्थानमध्ये मी देशासमोर काही गोष्टींचं सत्य ठेवलं आणि संपूर्ण काँग्रेस आणि इंडिया आघाडीत खळबळ उडाली. तुमची संपत्ती हिसकावून त्यांच्या खास लोकांना वाटून देण्याचे काँग्रेस एक खोल षडयंत्र रचत आहे हे सत्य मी समोर ठेवलं आहे... जेव्हा मी त्यांच्या या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा ते इतके चिडले की त्यांनी मोदींना सर्वत्र शिव्या द्यायला सुरुवात केली. मला काँग्रेसकडून जाणून घ्यायचे आहे की ते सत्याला इतके का घाबरतात? ते त्यांचे धोरण इतके का लपवतात, जेव्हा तुम्हीच पॉलिसी बनवली होती तेव्हा ते स्वीकारायला का घाबरता… हिंमत असेल तर स्वीकारा, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत..." असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे.