लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आवाज आता शांत झाला असून, शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निकालाची उत्कंठावर्धक प्रतीक्षाही सुरू होणार आहे. गेल्या ७६ दिवसांत नेत्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्लाबोल आणि उपरोधिक शब्दांचा वापर केला. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक दीर्घकाळ स्मरणात राहील. या निवडणुकीत ‘विष गुरू’, ‘अनुभवी चोर’, ‘दोन राजकुमार’ यांच्यासह ‘मंगळसूत्र’, ‘मुजरा’ अशा अनेक शब्दांच्या मदतीने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यामुळे जोरदार मथळे निर्माण केले होते. विविध माध्यमांच्या मंचांवरही यावर चर्चा झाली, या कारणांमुळे लोकसभा निवडणुकीचा उत्साह पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहिला होता.
नेत्यांनी एकमेकांवर केलेले हल्ले आणि शाब्दिक वार...
- अब्जाधीशांचा कठपुतळी राजा : राहुल गांधी
अदानी आणि अंबानी यांच्याकडून टेम्पो भरून रक्कम मिळविल्याचा मोदींनी आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना ‘टेम्पोवाल्या अब्जाधीशांचा कठपुतळी राजा’ असे म्हटले.
- दोन राजकुमार : राहुल, अखिलेश : मोदी
तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘दोन राजकुमार’ एकत्र आले आहेत, असे मोदींनी उत्तर प्रदेशातील एका निवडणूक सभेत सांगितले.
- मोदी ‘विष गुरू’ : जयराम रमेश
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले की, मोदींनी जी भाषा वापरली होती त्यावरून ते ‘विश्वगुरू’ नसून ‘विष गुरू’ आहेत.
- ‘मंडी में भाव क्या है?’ : सुप्रिया श्रीनेत
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मंडी, हिमाचल प्रदेशमधील भाजप उमेदवार कंगना रणौत यांचा फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले की, ‘मंडीत भाव काय सुरू आहे?’
- मोदी ‘स्वयंघोषित देव’ : जयराम रमेश
मोदींच्या ‘जैविकदृष्ट्या जन्मलेल्या..’ विधानावर राहुल यांनी म्हटले की, जर सामान्य व्यक्तीने हे बोलले असते तर डॉक्टरकडे नेले असते. जयराम रमेश यांनी मोदींना ‘स्वयंघोषित देव’ म्हटले.
- केजरीवाल ‘अनुभवी चोर’ : नरेंद्र मोदी
मुलाखतीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘अनुभवी चोरा’ला हात साफ कसा करायचे हे माहीत आहे.
- व्होट बँकेसाठी इंडिया मुजरा करतेय : मोदी
मोदींनी ‘इंडिया’वर मुस्लीम व्होटबँकेसाठी ‘मुजरा’ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
- महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेतील : मोदी
पंतप्रधानांनी दावा केला की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हिंदू महिलांचे ‘मंगळसूत्र’ हिसकावून ते ‘घुसखोर’ आणि ‘जास्त मुले असलेल्यां’मध्ये वाटण्याचे आश्वासन दिलेय.
- ‘ते’ म्हैसही हिसकावून घेतील : मोदी
जर कोणाकडे दोन म्हशी असतील तर विरोधी पक्ष एक म्हैस हिसकावून घेईल, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांवर प्रहार करत लालू प्रसाद म्हणाले की, मोदींना उंट दिला जाईल.
- मोदी खोट्यांचे सरदार : खरगे
मल्लिकार्जुन खरगे यांनी हरयाणातील मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांना ‘खोट्यांचे सरदार’ असे म्हटले.
- राहुल प्रियांका अमूल बेबी : शर्मा
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ‘अमूल बेबी’ असे म्हणत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, लोक त्यांच्या प्रचार कार्यक्रमात भाऊ आणि बहिणीला पाहण्यापेक्षा ‘काझीरंगातील वाघ आणि गेंडे’ पाहतील.
- भगवंत मान हे कागदी मुख्यमंत्री : मोदी
मोदींनी आप नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना ‘कागदी मुख्यमंत्री’ म्हटले.
- ‘बडा पप्पू’, ‘छोटा पप्पू’ : कंगना रणौत
अभिनेत्रीने राहुल गांधी आणि मंडीतील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना ‘बडा पप्पू’ आणि ‘छोटा पप्पू’ असे संबोधले. त्यांनी काँग्रेसला इंग्रजांनी सोडलेला रोग असेही म्हटले.
- इंडिया आघाडी घोटाळेबाजांचा मेळावा : मोदी
मोदींनी बिहारमधील एका सभेत म्हटले की, ‘इंडिया आघाडी’ हा ‘घोटाळेबाजांचा मेळावा’ आहे आणि त्याचे नेते भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण आणि ‘विकृत सनातन विरोधी मानसिकते’साठी ओळखले जातात.
- भाजप हा नोकरी खाणारा पक्ष : ममता बॅनर्जी
कोलकाता उच्च न्यायालयाने राज्यातील सुमारे २६,००० शिक्षकांची भरती रद्द केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ‘नोकरी खाणारा’ पक्ष म्हणून संबोधले.
- काँग्रेस हा पाकिस्तानचा फॅन : मोदी
काँग्रेसला पाकिस्तानचा ‘फॅन’ असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, इस्लामाबाद भारताचे पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देत आहे.
- संपलेला पक्ष आणि काँग्रेस कोण? : राजनाथ
राजनाथ सिंह यांनी म्हटले की, निकालानंतर सपा व काँग्रेस ‘संपलेले पक्ष’ असतील आणि काँग्रेस कोण, असे लोक विचारतील.
- राजकुमाराने महाराजांचा अपमान केला : मोदी
मोदींनी राहुल गांधी यांना राजकुमार म्हणत त्यांनी भारतातील राजे-महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला.
- आदिवासींचा द्वेष करणारे मोदी : केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, मोदी आदिवासींचा द्वेष करतात कारण त्यांनी सर्वांत मोठे आदिवासी नेते, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवले आहे.