"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 04:11 PM2024-05-27T16:11:02+5:302024-05-27T16:11:38+5:30
"तपास यंत्रणांच्या कारवाईत आमची कुठलीही भूमिका नाही. आजकाल भ्रष्टाचाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचण्याची फॅशन झाली आहे."
PM Modi Attack On Corruption: लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा येत्या 1 जून रोजी होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, या सातव्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणांच्या कारवाईवर स्पष्टपणे मत व्यक्त केले.
PM Shri @narendramodi's interview to IANS. https://t.co/1lizbxmBKH
— BJP (@BJP4India) May 27, 2024
केजरीवालांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "तपास यंत्रणांच्या कारवाईत आमची कुठलीही भूमिका नाही. विरोधकांकडून होणारा भ्रष्टाचाऱ्यांचा गौरव देशासाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या देशात जेव्हा कोणी लोक भ्रष्टाचारात पकडले जायचे किंवा आरोप व्हायचे, तेव्हा इतर लोक त्यांच्यापासून शंभर पावले दूर जायचे. आजकाल भ्रष्टाचाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचण्याची फॅशन झाली आहे. कालपर्यंत ज्या गोष्टींचा विरोध करायचे, आज त्यांना जवळ घेत आहेत. पूर्वी हेच लोक सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करायचे, आता सोबत आहेत."
यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाविरोधात वक्तव्ये करणाऱ्या लोकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "चुकीच्या गोष्टी सांगणाऱ्यांनी देशाचे खूप नुकसान केले. पूर्वी बाहेरुन वस्तू देशात यायच्या तेव्हा हे लोक म्हणायचे आम्ही देश विकत आहोत. आता देशात वस्तू बनवल्या जातात, तर हेच लोक म्हणतात की, हे जागतिकीकरणाचे युग आहे आणि तुम्ही लोक काय देशातच वस्तू बनवण्याच्या गप्पा मारता. अमेरिकेत कोणी अमेरिकन व्हा, अमेरिकेतील वस्तू विकत घ्या, म्हटल्यावर आपल्याला अभिमान वाटतो. मी जर हे देशातील लोकांना म्हटले, तर मला जागतिकीकरणाच्या विरोधात असल्याचे सांगतात," अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.