Lok Sabha Elections 2024: काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आणि तेव्हापासूनच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सातत्याने येत आहेत. अशातच, तृणमूल काँग्रेसचे (TMC) एक शिष्टमंडळ सोमवारी (8 एप्रिल) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचले. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे ED, CBI, NIA आणि Income Tax प्रमुखांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.
टीएमसी नेते पोलिसांच्या ताब्यातTMC केंद्रावर तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत असून, त्यांना बदलण्याची मागणी करत आहे. टीएमसीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर 24 तास आंदोलन करण्याची घोषणा केली. मात्र, आंदोलनावर बसलेल्या टीएमसी खासदारांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना ताब्यात घेतले. टीएमसी नेत्या डोला सेन म्हणाल्या की, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहे. निवडणूक आयोगाने तपास यंत्रणांच्या प्रमुखांना हटवून इतर पक्षांना समान संधी निर्माण करावी.
भाजप आणि एनआयएमध्ये हातमिळवणी तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी 'एक्स' वर एका पोस्टमध्ये एनआयएच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीपूर्वी केंद्राने निवडणूक आयोगाची मान्यता घेतली होती का, असा सवाल केला आणि या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे केंद्रीय एजन्सींशी असलेले 'संबंध' अधिकच घट्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.