बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ह्या लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपच्या तिकीटावर नशीब आजमावत आहेत. कंगना यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते नितीन गडकरी यांसारखे मोठे नेते मंडी येथे पोहोचले. आज गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंगना यांच्या प्रचारासाठी मंडी येथे हजेरी लावली. सातव्या टप्प्यात १ जून रोजी मंडी येथे मतदान होणार आहे.
मंडी येथे जाहीर सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी कंगना यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जेव्हा मला सांगण्यात आले की, मंडी येथे प्रचारासाठी जायचे आहे. तेव्हा मी लगेच सांगितले की, कंगना यांच्यासाठी जरूर जायचे. हिमाचलच्या या मुलीमध्ये मीरासारखी भक्ती आहे, राणी पद्मावतीसारखे तेज आहे आणि विरोधकांचा सामना करण्यासाठी कंगना यांच्याकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य देखील आहे. तुम्ही पाहिले असेल की, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारला रस्त्यावर आणून धडा शिकवला होता.
यावेळी भाजप उमेदवार कंगना राणौत म्हणाल्या की, मला पहिले वाटायचे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नातेसंबंधांची किंमत नाही. पण जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले की, तू माझी लहान बहीण आहेस. तू क्षत्रिय आहेस... तुझे आणि आमचे रक्त एकच आहे. तू उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्यापासून मी तुला भेटण्याची वाट पाहत होतो. मंडीची जागा देशात स्वाभिमानाचा विषय बनली आहे. भारतीय जनता पक्षाला हे चांगलेच माहिती असून, त्यांच्यासाठी ही स्वाभिमानाची जागा आहे. या जागेवर आम्हाला निवडून द्या.
दरम्यान, २०२२ च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा थोडक्यात पराभव झाला. अशा स्थितीत राज्याचेही नुकसान झाले. आता ही चूक जनतेने पुन्हा करू नये. मोदींच्या गॅरंटीवर आज संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आपल्याला पंतप्रधान मोदींसोबत डावीकडे किंवा उजवीकडे नाही तर सरळ चालायचे आहे, असे कंगना यांनी आणखी सांगितले.