केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला हात लावण्याचे धाडस नाही असं म्हटलं आहे. करनदीघी येथील निवडणूक रॅलीदरम्यान अमित शाह म्हणाले की, तृणमूलच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी अव्याहतपणे सुरू आहे. मुख्यमंत्री सीमावर्ती राज्यात घुसखोरी थांबवू शकत नाहीत. ममता बॅनर्जी घुसखोरी थांबवू शकतात का? त्या रोखू शकत नाहीत. फक्त मोदीजी घुसखोरी थांबवू शकतात.
रायगंजमधून भाजपाचे उमेदवार कार्तिक पॉल यांच्या समर्थनार्थ रॅली काढताना शाह यांनी गेल्या वेळी तुम्ही आम्हाला 18 जागा दिल्या होत्या. मोदींनी राम मंदिर दिले. यावेळी आम्हाला 35 जागा द्या, आम्ही घुसखोरी थांबवू. संदेशखाली वादाचाही गृहमंत्र्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी महिलांवर अत्याचार होऊ दिले जेणेकरून त्यांच्या व्होट बँकेवर परिणाम होऊ नये. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि आज आरोपी तुरुंगात आहेत.
कथित अनियमिततेमुळे सरकारी शाळा कर्मचाऱ्यांच्या सुमारे 25,000 नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अमित शाह यांनी संदर्भ दिला. भाजपाला मत द्या, ममता बॅनर्जींच्या गुंडांना उलटं लटकवले जाईल. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास केंद्र उत्तर बंगालमध्ये एम्स बांधेल, असे आश्वासनही अमित शाह यांनी दिले.
आम्ही रायगंजमध्ये एम्सची योजना आखली होती. ममता दीदींनी ते बंद केले. ही मोदीजींची गॅरंटी आहे. आम्हाला 30 जागा द्या, आम्ही उत्तर बंगालमध्ये पहिल्या एम्सचे काम सुरू करू असं म्हटलं आहे. 2019 मध्ये रायगंजची जागा भाजपाने जिंकली होती. उत्तर बंगालमधून तृणमूलने आमदार कृष्णा कल्याणी यांना उमेदवारी दिली आहे. रायगंजमध्ये शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.