Amit Shah on Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले असून, आता चौथ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री शाह आले होते.
सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतात, त्यामुळेच पाकिस्तान त्यांची स्तुती करतो. ते अमेठी, वायनाड आणि रायबरेलीमधून पराभूत होतील. आता त्यांनी थेट इटलीला शिफ्ट व्हावं, अशी बोचरी टाकी शाह यांनी केली.
तर, अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना शाह म्हणतात, कोरोना महामारी आली, तेव्हा अखिलेश यादव आणि डिंपल यादव कुठेच दिसत नव्हते. त्यावेळी फक्त सुब्रत पाठक यांनी कन्नौजच्या लोकांसाठी पुढे येऊन मदत केली. त्यावेळी अखिलेश यादव राज्यात असते, तर मृतदेहांचा ढीग पडला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशाला कोरोनापासून वाचवले.
सपाला इतर पक्षांची गरज नाही, ते आपापसात भांडण्यात व्यस्त असतात, त्यांच्या सभांमध्ये लाथा-बुक्क्या चालतात. इथे वर्षानुवर्षे तुम्ही मुलायम सिंह यांच्या कुटुंबाला मतदान केले, पण ते घराणेशाही पक्ष आहेत, त्यांना कुटुंबाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.