नवी दिल्ली - संविधानातील कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरात काय बदलले हा प्रश्न कायम विचारला जातो. मात्र या प्रश्नाचं उत्तर सोमवारी मतदानाच्या दिवशी बारामूला परिसरातील जनतेनं दिलं आहे. १९९० च्या दशकापासून दहशतवाद्यांचा गड राहिलेल्या बारामूला भागात ५८.६२ टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्या ४० वर्षातला हा नवा रेकॉर्ड बनला आहे. त्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांच्या गडात लोकशाहीचा झेंडा रोवला आहे.
जम्मू काश्मीरमधील बारामूला लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार याठिकाणी ५८.६२ टक्के मतदान झालं. ही टक्केवारी १९८४ नंतरची सर्वात मोठी आहे. बारामूला भागात १९८४ मध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान म्हणजे ६१.१ टक्के मतदान झालं. मात्र १९८९ पासून या भागात फुटिरतावाद्यांचे लोण पसरले. त्यामुळे मतदान ५.५ टक्क्यांपर्यंत आलं होते. १९९० च्या दशकापासून उत्तर काश्मीरमधील हा भाग दहशतवाद्यांचा गड मानला जायचा.
मात्र कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच या भागात मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानात सहभाग नोंदवला. दहशतवाद्यांच्या कुटुंबानेही लोकशाही प्रक्रियेत भाग घेतला. याठिकाणी लष्कर ए तोएबामधील दहशतवाद्याच्या भावाने सांगितले की, मतदान माझा अधिकार आहे, त्यासाठी मी मतदान दिले. तर युवकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. बारामूला भागात मोठ्या प्रमाणात युवक मतदानासाठी मैदानात उतरले असं त्याने सांगितले.
दरम्यान, बारामूला भागात स्थानिक क्रिकेट खेळाडूंच्या टीमनं क्रिकेट मॅच सोडून सोपोर भागातील सिलू इथल्या मतदान केंद्रावर पोहचले. राज्यात बदल करण्यासाठी आम्ही मतदान केले. मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. नव्या पिढीला क्रांती हवी असं युवा क्रिकेटरांनी सांगितले. छोटा पाकिस्तान म्हणून ओळख असणाऱ्या सोपोरमध्ये मागील काही दशकांपासून अत्यंत कमी प्रमाणात मतदान झालं आहे. विकासासाठी मतदान गरजेचे आहे. मागील ७० वर्षापासून इथं विकास झाला नाही. त्यामुळे बदल घडायला हवा यासाठी मी पहिल्यांदा मतदान केले असं युवा क्रिकेटर मुअज्जिन मंजूर याने म्हटलं.
इतकेच नाही तर बारामूला भागात २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु प्रमुख लढत ही ३ उमेदवारांमध्ये आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीपुल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन, अवामी इत्तेहाद पार्टीचे शेख रशीद अहमद ज्यांना इंजिनिअर रशीद नावानं ओळखलं जाते त्यांच्यात लढत आहे. सोमवारी इथं मतदानासाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला. मतदानादिवशी कुठलाही हिंसाचार न घडला लोक मतदानासाठी इतक्या मोठ्या संख्येने बाहेर आल्यानं इतिहास रचला गेला.