नवी दिल्ली - Narendra modi on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या जर त्यांच्यावर काही संकट आले तर मी पहिला व्यक्ती असेन जो त्यांची मदत कुटुंबासाठी करेन. बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मानसन्मान करत आलोय आणि यापुढेही करेन. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी मी जगेन, माझ्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. मी ते कर्ज विसरू शकत नाही. आज आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
एका मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही मागील निवडणुकीत समोरासमोर लढलो, पण एकही शब्द बाळासाहेबांविरोधात बोललो नाही. उद्धव ठाकरे मला कितीही काही बोलू द्या, पण माझी बाळासाहेब ठाकरेंप्रती श्रद्धा आहे मी एकही शब्द बोलणार नाही. मी बाळासाहेबांचा आदर करतो, आयुष्यभर करत राहीन. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेविरोधात गेलेत. सावरकरांचा ज्यांनी अपमान केला, ओरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यासोबत बाळासाहेबांचा मुलगा बसतो याचा राग लोकांमध्ये आहे. बाळासाहेबांनी जे सांगितले, त्याच्याविरुद्ध जात सत्तेच्या लालसेपोटी त्यांचा मुलगा काय करतोय हे पाहून लोकांमध्ये चीड आहे असंही मोदींनी म्हटलं. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच महाराष्ट्रात भावनिक बाजू महायुतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, अधिकृतपणे राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. घराणेशाहीच्या सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली. मुलाला पुढे आणण्यासाठी बाळासाहेबांचे विचार बाजूला गेले. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण आयुष्य खर्ची घातलं. ती बाळासाहेबांची शिवसेना आज आमच्यासोबत आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या स्थितीबाबत शरद पवार कितीही त्याला राजकीय रंग देत असले तरी हा वाद कौटुंबिक आहे. हे घरातलं भांडण आहे. वारसा काम करणाऱ्या पुतण्याला द्यायचा की मुलगी म्हणून मुलीकडे सोपवायचा हा वाद त्यांचा आहे. हे त्यांचे भांडण आहे. त्यामुळे सहानुभूतीपेक्षा लोकांमध्ये राग जास्त आहे. जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला कसं सांभाळणार? असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना टार्गेट केले.