नवी दिल्ली : कन्हैया कुमार बिहारमधील बेगूसराय मतदार संघातून सीपीआयच्या (CPI) तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्याविरोधात भाजपाचे नेता गिरिराज सिंह मैदानात आहेत. कन्हैया कुमार यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री स्वरा भास्कर, जिग्नेश मेवानी यांनी पुढाकार घेतला आहे. स्वरा भास्कर आपल्या ट्विटर पेजवरुनही कन्हैया कुमार यांचा प्रचार करताना दिसत आहे. दरम्यान, कन्हैया कुमार यांनी एक ट्विट केले आहे. याला रिप्लाय करताना बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी कन्हैया कुमार यांना 'दहशतवादी' म्हटले आहे.
कन्हैया कुमार यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत आपल्या ट्विटर पेजवर ट्विट केले. यामध्ये 'ही लढाई शिक्षण आणि कढई यांच्यातील आहे. एका बाजूला असे लोक आहेत, जे शिकून आपले आणि देशाचे भविष्य बनवू पाहतात. तर दुसरीकडे असे लोक आहेत, जे तरुणांकडून दरदिवशी 200 रुपये देऊन भजी तळून घेऊ पाहत आहेत. कोणत्याही इंजिनीअरला बळजबरी म्हणून खलाशी होणे, हा रोजगार नाही. तर सरकारी धोरणांचा अत्याचार आहे', असे कन्हैया कुमार यांनी ट्विट केले आहे.
कन्हैया कुमार यांनी केलेले ट्विट सोशल मीडियात जास्त व्हायरल झाले. मात्र, 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमाचे सहनिर्माते अशोक पंडित यांनी कन्हैया कुमारच्या ट्विटला उत्तर दिले आणि आपली प्रतिक्रिया मांडली. 'तू तिन्ही कॅटेगरीमध्ये येत नाहीस, कारण तू देशाचे टुकडे टुकडे करु पाहतोस. तू एका दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीस. हा देश तुला माफ करणार नाही. डिपॉजिट तर जप्त होणार तुझे.', अशा शब्दात अशोक पंडित यांनी कन्हैया कुमार यांच्यावर आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.