Lok Sabha Elections 2024 : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या दोन माजी न्यायाधीशांसह एका पत्रकाराने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांना एकाच मंचावर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. राहुल गांधी यांनीही हे अमंत्रण स्वीकारले आणि पंतप्रधान मोदींना एका मंचावर येण्याचे आव्हान दिले. यानंतर आता भारतीय जनता युवा मार्चचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी राहुल यांचे आव्हान स्वीकारले असून, याबाबत एक पत्रही लिहिले आहे.
तेजस्वी सूर्या यांनी X वर पत्र शेअर करताना लिहिले की, 'प्रिय राहुल गांधी, भारतीय जनता युवा मोर्चने आमचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना तुमच्याशी चर्चा करण्यासाठी नियुक्त केले आहे. अभिनव प्रकाश हे पासी (एससी) समाजातील तरुण आणि सुशिक्षित नेते आहेत. रायबरेलीमध्ये त्यांचा समाज सुमारे 30 टक्के आहे. हा राजकीय वंशज आणि सामान्य तरुण यांच्यातील समृद्ध चर्चा असेल.'
कोणी दिले चर्चेसाठी आमंत्रणनिवृत्त न्यायमूर्ती मदन बी लोकूर, न्यायमूर्ती अजित पी शाह आणि ज्येष्ठ संपादक एन राम यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष गांधी आणि पंतप्रधानांना पत्र लिहून लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्द्यांवर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. यानंतर राहुल गांधी यांनी ते अमंत्रण स्वीकारले, पण भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. यावरुन काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर टीकाही केली होती. पण, आता भाजपने हे आमंत्रण स्वीकारुन राहुल गांधींनाच आव्हान दिले आहे.