नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रात्री उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. मध्यवर्ती निवडणूक समितीच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 36 उमेदवारांचा समावेश असलेली आपली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रामधील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. याआधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 184 जणांचा समावेश आहे.
भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्या नावाचाही समावेश असून, पात्रा यांना ओदिशामधील पुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपाचे ओदिशामधील प्रदेशाध्यक्ष बसंतकुमार पांडा यांना कालाहांडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रामधील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जळगाव येथून स्मिता उदय वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपाने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.
ठरलं! पुण्यातून गिरीश बापट, तर सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर आज दूर झाला आहे. पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर भाजपाने ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेनुसार जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज भाजपाने महाराष्ट्रामधील अन्य चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही केली आहे. महाराष्ट्रामधील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
पुणे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. पुणे शहर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या दोन यादीत विद्यमान खासदार शिरोळे यांचे नाव नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान गिरीश बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी सुरू केल्या होत्या. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे बंड थंड झाले होते. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते.
गुजरातमधील गांधीनगर या पारंपरिक मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे नाव जाहीर झाल्याने पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या अडवाणींचे युग संपल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलेल्या 20 राज्यांतील 184 जणांच्या या यादीत नरेंद्र मोदी (वाराणसी) नितीन गडकरी (नागपूर), राजनाथ सिंह (लखनऊ), डॉ. सत्यपाल सिंह (बागपत), हेमा मालिनी (मथुरा), व्ही. के. सिंग (गाझियाबाद), साक्षी महाराज (उन्नाव), स्मृती इराणी (अमेठी), रावसाहेब दानवे (जालना) अशा प्रमुख नावांचा समावेश आहे. या यादीत विद्यमान 24 खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. बिहारमधील 17 उमेदवारांची नावेही पक्षाने निश्चित केली असली, तरी ती तेथील युतीच्या उमेदवारांसोबत जाहीर केली जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली.
भाजपा लढणार लोकसभेच्या 543 पैकी केवळ 435 जागा, उरलेल्या जागा मित्रांना
लोकसभेच्या 543 जागांपैकी भारतीय जनता पार्टी 435 जागा लढवणार असून, उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. गेल्या म्हणजे 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 429 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. यंदा रालोआमधून तेलगू देसम, राष्ट्रीय लोकशक्ती पार्टी व अन्य पक्ष बाहेर पडले असल्याने भाजपाला 7 ते 10 जागा अधिक लढवता येणार आहेत. भाजपाला याहून अधिक जागा लढवता आल्या असत्या, पण यंदा बिहारमध्ये जनता दल (संयुक्त)शी भाजपाचा समझोता झाला आहे. त्या पक्षासाठी भाजपाला आपल्या वाट्यातील पाच जादा जागा सोडाव्या लागल्या आहेत. त्या जागांवर गेल्या वेळी भाजपा विजयी झाली होती.
ओडिशा, बंगालवरच लक्ष
यंदाही या राज्यांत जवळपास सर्व जागा भाजपा लढत आहे, पण तिथे आता भाजपाची फारशी ताकद दिसत नाही. अर्थात, वायएसआर काँग्रेस (आंध्र प्रदेश) व तेलंगणा राष्ट्र समिती (तेलंगणा) यांच्या संपर्कात आहे. निवडणूक निकालांनंतर गरज भासल्यास हे पक्ष मदत करू शकतील, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळे आंध्र व तेलंगणापेक्षा पश्चिम बंगाल व ओडिशावरच भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय काँग्रेसचा उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये अनुक्रमे सपा-बसपा आघाडी व आम आदमी पक्षाशी समझोता न झाल्याने भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे.