पाटणा - लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी रविवारी (19 मे) मतदान होत आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तेजप्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला झाला असून संतप्त कॅमेरामनने गाडीची काच फोडल्याची घटना समोर आली आहे.
राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव मतदानाहून परतताना त्यांच्या अंगरक्षकाने कॅमेरामनला मारहाण केली. कॅमेरामनने फुटेज मिळवत असताना गाडीचं विंडशिल्ड तोडल्यामुळे अंगरक्षकाने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती आधी समोर आली होती.
तेजप्रताप यादव यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. आपल्याला मारण्यासाठी हा कट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझ्या अंगरक्षकाने काहीही केलेलं नाही, उलट कॅमेरामननेच माझ्या गाडीचं नुकसान केलं आहे, असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं आहे.
सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे. मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण २३ मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.