लोकमत न्यूज नेटवर्क, अमळनेर (जि.जळगाव): देशामध्ये विविध राज्यांचे चित्र बदलतेय. सत्ताधारी पक्षाला मतदार जागा दाखवत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असे वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी अमळनेरात झाले. त्यानंतर ते म्हणाले की, दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमद्वारे निकाल बदलले जाऊ शकतात, असे सिद्ध केले. म्हणूनच निवडणुकीची जुनी पद्धत असावी, अशी आमची मागणी आहे. कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमातून हेडगेवार यांचा धडा वगळण्यात आला. त्यावर भाजप टीका करत आहे, यावर पवार म्हणाले की, लहान मुलांचे वय संस्कारक्षम वय असते. त्यांच्या मनावर योग्य परिणाम होतील असे लिखाण अभ्यासात असावे. हा मुद्दा जाहीरनाम्यात होता.
एकत्र येऊन लढू!
भाजपविरोधात देशभरातील सर्व पक्ष समान कार्यक्रमावर एकत्र येऊन लढणार आहेत. हा कार्यक्रम ठरविताना जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. समान नागरी कायद्याचा प्रस्ताव अद्याप सभागृहात आला नाही. जेव्हा समोर येईल, तेव्हा योग्य चर्चा करता येईल. - शरद पवार
बीआरएस ही भाजपची ‘बी’ टीम : पवार
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्रसमिती अर्थात ‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम आहे, असा आरोप पवारांनी केला.
नितीशकुमारांनीही केला हल्लाबोल
पाटणा : एकजुट झालेल्या विरोधी पक्षांचे सामर्थ्य कमी करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप २०२४ मध्ये मुदतीआधीच लोकसभा निवडणुका घेण्याची शक्यता असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे मुदतीआधी लोकसभा निवडणुका घेण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. विरोधकांच्या एकजुटीचा भाजपच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज भाजप नेत्यांना आला आहे. त्यामुळेच भाजपने त्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी मार्च वा एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित आहेत. मात्र, या मुदतीआधी निवडणुका घेऊन भाजप विरोधी पक्षांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करू शकते, असा दावा त्यांनी केला.
...तर परिवर्तन होईल!
आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. देशाच्या राजकारणात त्यामुळे मोठे परिवर्तन होणार आहे. - नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार
विरोधी पक्षांची बैठक
विरोधी पक्षांची पाटणा येथे २३ जून रोजी एक बैठक मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आयोजित केली आहे. त्यामध्ये काँग्रेसही सहभागी होणार आहे. विरोधी पक्षांमध्ये एकजूट साधून लोकसभा निवडणुकांत भाजप पराभव करणे हा या मागचा उद्देश आहे.