कोलकाता - आगामी २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपाकडून पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरू असून केंद्रीयमंत्र्यांना अनेक राज्यात पाठवण्यात येत आहे. तसेच, भाजपाशासित राज्यातील सरकारद्वारे जनतेला मोदी सरकारच्या कामाची आणि राज्य सरकारच्या योजनांचा माहिती देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभारली असून भाजपचा पराभव हेच लक्ष्य असल्याचे सर्वांनी म्हटलं आहे. याच इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यातील युवा वर्गांना उद्देशून भाषण केले. यावेळी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष डिसेंबर महिन्यातच आगामी लोकसभा निवडणुका घेऊ शकते. कारण, भाजपाने निवडणुकांच्या प्रचारासाठी अगोदर हेलिकॉप्टर बुक केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रॅलीत सहभागी झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी भाजपावर निशाणा साधला. जर भाजपाला देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर मनमानी कारभाराचे सरकार, निरंकुश सरकार देशवासीयांना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
भाजपा डिसेंबर २०२३ मध्येच निवडणुका घेऊ शकते. भाजपाने निवडणुकांसाठी हेलिकॉप्टर बुक करुन ठेवले आहेत. इतर राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर प्रचारासाठी वापरता येऊ नयेत, म्हणून भाजपने ही खेळी खेळल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला. दरम्यान, एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होत आहे. त्यासाठी, विरोधी पक्षही एकवटला असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतर्फे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेनं पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात एनडीएनेही ३८ पक्षांना एकत्र घेऊन आघाडी केली आहे.