निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:23 PM2024-05-28T13:23:00+5:302024-05-28T13:23:39+5:30

loksabha Election - येत्या ४ जून ला देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून तत्पूर्वी इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर राहतील. 

Lok Sabha Elections - Mamata Banerjee wait and watch role till the result, will be absent from the India alliance meeting | निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?

निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?

कोलकाता - १ जूनच्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडीचे नेते दिल्लीत एकत्र येणार आहेत. मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत. निवडणुकीपूर्वीही ममता यांनी इंडिया आघाडीच्या अनेक बैठकांपासून अंतर राखलं होतं. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं याला माझं प्राधान्य असल्यानं मी दिल्लीला जाणार नाही असं ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे. परंतु राजकीय दृष्ट्‍या त्यांच्या या निर्णयातून वेगळेच संकेत मिळत आहेत. 

राजकीय तज्ज्ञानुसार, ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावला आहे. त्यामुळे सध्या वेट अँन्ड वॉच या भूमिकेत त्या आहेत. बंगालमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे त्यामुळे भाजपा विजयाचा दावा करत आहे. त्यात १ जूनच्या बैठकीत इंडिया आघाडीचे नेते पंतप्रधानपद आणि निकालानंतरची रणनीती यावर चर्चा करणार आहेत. या बैठकीत नव्या सहकारी मित्रपक्षांचा समावेश यावरही चर्चा होईल अशी माहिती आहे.

मागील वर्षी २३ जूनला इंडिया आघाडीची पहिली बैठक पटणा येथे झाली होती. ज्याचे संयोजक नितीश कुमार होते. त्यानंतर विरोधकांच्या ३ बैठका झाल्या त्यात ममता बॅनर्जींनी हजेरी लावली होती. तिसऱ्या बैठकीनंतर इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांनी वेगळा मार्ग पकडला. १९ डिसेंबरच्या दिल्लीतील बैठकीत बंगालच्या जागावाटपावरून ममता बॅनर्जींचा काँग्रेसशी वाद झाला. त्यानंतर ममता यांनी स्वबळावर सर्व ४२ जागा लढण्याचा निर्णय घोषित केला. त्यामुळे काँग्रेसला डाव्यांसोबत निवडणुकीत उतरावं लागलं. 

त्यानंतर ३१ मार्चला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत झालेल्या लोकशाही बचाओ रॅलीत विरोधी पक्षाचे नेते एकजूट झाले, त्यात ममता बॅनर्जी आल्या नाहीत. त्यांनी टीएमसी प्रतिनिधी पाठवला. त्यानंतर अलीकडेच ममता बॅनर्जी यांनी जर इंडिया आघाडीचं सरकार बनलं तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ अशी घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी भूमिका बदलली. 

दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी विरोधी पक्ष एकमेकांची ताकद जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. केंद्रात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांचं बहुमत लागतं. जो जितक्या जागा जिंकेल, तितका वाटा सत्तेत मिळू शकतो. ममता बॅनर्जी आघाडीतील मोठ्या वाटेकरी होऊ शकतात जर त्यांनी बंगालमध्ये ३० हून अधिक जागा जिंकल्या. अशीच परिस्थिती बिहारमध्ये तेजस्वी यादव, तामिळनाडूत स्टॅलिन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे-शरद पवारांची आहे. या नेत्यांनाही लोकसभा निवडणुकीच्या निकालात ९० टक्क्याहून अधिक जागा मिळवाव्या लागतील. 

ममतांच्या नाराजीमागचं कारण...

पश्चिम बंगालमध्ये यंदा मोठं आव्हान आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे भाजपा पुन्हा एकदा मोदी लाट, मोफत रेशन, आक्रमक निवडणूक प्रचारानंतर ४०० पारचा दावा करत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी जास्त यश मिळवेल अशी शक्यता कमी होत चालली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर यंदा फार मोठा बदल होईल असं चित्र नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी निवडणूक निकालानंतर पत्ते उघडतील असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जींनी दूर राहण्यामागे आणखी एक कारण असू शकतं. ४ जूनच्या निकालात इंडिया आघाडीतील पक्षांना किती जागा मिळतील हे स्पष्ट होईल. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच राहुल गांधींनी अजेंडा निश्चित केला आहे. त्यात विना चर्चा करता जातीय जनगणना, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज आहेत असं बोललं जातं.  

Web Title: Lok Sabha Elections - Mamata Banerjee wait and watch role till the result, will be absent from the India alliance meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.