संजय शर्मा -
नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तारखा डोळ्यासमोर ठेवूनच पक्षाने पुढील ५८ दिवस निवडणूक प्रचाराची रणनीती तयार केली आहे. त्यामुळे निवडणुका एकतर लवकर होतील किंवा पुढे ढकलल्या जातील, या शक्यता जवळपास मावळल्याचे दिसत आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गाची मने जिंकण्याची देशव्यापी रणनीती भाजपने आखली आहे.
भाजपच्या चार प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीसांकडे या चार वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे संपूर्ण लक्ष युवक, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गांवर असणार आहे. त्यामुळे भाजपची नवी घोषणा ‘अब की बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’ महत्त्वाची आहे. या निवडणुकीत राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.
यापूर्वी कधी झाल्या लोकसभा निवडणुका? २०१४ २०१९निवडणुकीची घोषणा ५ मार्च १० मार्चमतदानाचे टप्पे ७ एप्रिल ते १२ मे ११ एप्रिल ते १९ मेमतमोजणी १६ मे २३ मेशपथविधी २६ मे ३० मे
रविवारपासून आयोग राज्यांच्या दौऱ्यावर- लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग ७ जानेवारीपासून राज्यांच्या दौऱ्यांना प्रारंभ करणार आहे. आयोग सर्वप्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार आहे.
- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, तसेच निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, अरुण गोयल हे दि. ७ ते १० जानेवारी दरम्यान आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा दौरा करतील. त्याआधी दि. ६ जानेवारीला उपनिवडणूक आयुक्त या दोन राज्यातील पूर्वतयारीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देतील.
- लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी उपनिवडणूक आयुक्तांनी याआधीच सर्व राज्यांत पाहणी केली आहे.
हा दाैरा नेमका कशासाठी?विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या आधी निवडणूक आयोग विविध राज्यांचा दौरा करतो. त्या राज्यांतील राजकीय नेते, वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत आयोग चर्चा करतो. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग देशातील सर्व राज्यांचा, केंद्रशासित प्रदेशांचा दौरा करणार का याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
या चौघांवर मोठी जबाबदारी- तरुण चुघ यांच्याकडे गरीब, महिला आणि तरुण या तीन वर्गांचे काम सोपविले आहे. त्यांना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रभारी बनविण्यात आले असून, त्यांच्याकडे महिला गटाची जबाबदारीही देण्यात आली आहे. सेल्फ हेल्प ग्रुप अंतर्गत एक कोटी महिलांना जोडण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.- राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना ओबीसी मोर्चाचे प्रभारी बनविण्यात आले आहे. ओबीसी समुदायही गरीब वर्गात येतो.- सुनील बन्सल यांना युवा मोर्चाचे प्रभारी, तर बंडी संजय कुमार यांना किसान मोर्चा प्रभारी करण्यात आले आहे. - युवक, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गांवर लक्ष केंद्रित करून भाजप या वर्गांना जोडण्यासाठी मोठी रणनीती बनवत आहे. या चारही वर्गांना विरोधी पक्षांच्या जातनिहाय जनगणनेचे प्रत्युत्तर म्हणून पहिले जात आहे.
केंद्रीय नेतृत्व राज्यांना देईल योजनालोकसभा निवडणुकीपूर्वी १५ जानेवारीपर्यंत भाजपचे केंद्रीय नेतृत्व देशातील सर्व राज्यांचा दौरा करेल. तसेच, या राज्यांना निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आखलेली रणनीती सांगणार आहे. राज्यांमधील नेतृत्व ही योजना संपूर्ण राज्यात जिल्हा ते बुथ स्तरापर्यंत राबविणार आहे. या योजनेंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि जम्मूच्या सलग पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या सर्व राष्ट्रीय सरचिटणिसांना या योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये पाठविले जात आहे.