लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संसदेच्या सुरक्षेत बदल झाला आहे. संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १४०० सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना त्यांची शस्त्रे, वाहनांसह हटविण्यात आले आहे. सोमवारी सीआयएसएफच्या ३००० जवानांनी संसदेचा ताबा घेतला आहे. १३ डिसेंबरला संसदेत स्मोक बॉम्ब घेऊन घुसलेल्या आंदोलकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सीआरपीएफने १७ मे रोजी आपल्या १४०० जवानांना संसदेच्या सुरक्षा ड्युटीवरून हटण्याचे आदेश दिले होते. तसेच सोबत आपली वाहने, शस्त्रे आणि कमांडो देखील हटविले होते. गेल्या वर्षी संसदेत झालेल्या घुसखोरीवरून सुरक्षेतील त्रुटी लक्षात आल्या होत्या. यामुळे सीआरपीएफकडून संसदेची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या घटनेनंतर सीआरपीएफ महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीआरपीएफ पीडीजी, दिल्ली पोलिस (सुमारे 150 कर्मचारी) आणि संसद सुरक्षा कर्मचारी आदींना हटविण्यात आले आहे. सीआयएसएफचे जवान गेल्या 10 दिवसांपासून इमारतींशी परिचित होण्यासाठी सराव करत आहेत.
१३ डिसेंबरला काय घडलेले...13 डिसेंबर 2023 रोजी झिरो अवर दरम्यान, दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या कक्षेत उडी मारली आणि बुटामध्ये लपविलेल्या पिवळ्या धुराच्या कांड्या फोडल्या होत्या. तसेच संसदेबाहेर आणखी दोन व्यक्तींनी घोषणाबाजी करताना एका कॅनमधून रंगीत धूर सोडला होता.