नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आणखी शिल्लक आहे. मात्र विविध पक्षातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका अजुन कायम आहे. काँग्रेसनेते मनीशंकर अय्यर यांचा वाद थांबतो ना थांबतो तोच पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते मनप्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला भारताचा वाघ म्हणतात. ते नक्कीच वाघ असतील, परंतु वाघ दोन प्रकारचे असतात. एक जंगलातला असतो आणि दुसरा सर्कसमधील. आम्हाला तर मोदी सर्कशीतील वाघ वाटतात, असं वादग्रस्त वक्तव्य मनप्रीत सिंग यांनी केले. पंजाबमधील सर्व १३ लोकसभा मतदार संघात १९ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी विविध नेत्यांच्या सभा होत आहेत. त्यापैकी एक प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
काँग्रेसनेते मनीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींना नीच म्हणून संबोधल्याने दोन वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी त्यांना पक्षातून निलंबीत देखील केले होते. गुजरात निवडणुकीच्या वेळी केलेल्या आपल्या वक्तव्याचे समर्थन अय्यर यांनी केले आहे. आता मनप्रीत सिंग यांनी मोदींना सर्कशीतील वाघ म्हटल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मोदींना सर्कशीतील वाघ म्हटल्याप्रकरणी काँग्रेसकडून मनप्रीत सिंग यांच्यावर कारवाई करण्यात येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर भाजप याला काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.