नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (25 एप्रिल) बिहारच्या दरभंगा येथील प्रचारसभेत दहशतवादावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'महामिलावट करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत 350 लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? आपल्या शेजारी दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरू आहे' असे मोदींनी म्हटले आहे. तसेच काही लोकांना ''भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' असं म्हणायला प्रोब्लेम आहे. मग अशा लोकांचं डिपॉझिट जप्त व्हायला नको का?' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
मोदींनी 'भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणाच आमच्या आयुष्यातील शक्ती आहे. आपल्या आजुबाजूला दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे आणि काही लोक दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही असं म्हणतात. दहशतवादाने श्रीलंकेत 350 हून अधिक लोकांचे प्राण घेतले, मग हा प्रमुख मुद्दा वाटत नाही का?' असा सवालही विचारला. 'महामिलावट' करणाऱ्यांसाठी दहशतवाद हा प्रमुख मुद्दा नसेल, पण भारतात दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे. गरिबांचे सर्वाधिक नुकसान दहशतवादामुळेच झाले, असा दावा मोदींनी केला आहे. तसेच तुमचे एक मत मोदींना दिले तर मोदी दहशतवाद संपवल्यावरच शांत बसणार, आपला देश हा मजबूत असायला पाहिजे आणि त्यासाठी देशात एक मजबूत सरकार हवं. तुमचे एक मत दहशतवाद संपवू शकते आणि यासाठी तुम्ही चौकीदाराला पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील प्रचारसभेत विरोधकांवर निशाणा साधला होता. पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप असल्याचा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे. झारखंडमध्ये बुधवारी (24 एप्रिल) एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी विरोधकांवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांनी 'आधी विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असं दिसतंय की पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचं त्यांनी ठरवलं आहे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परिक्षेत पेपर चांगला गेला नाही तर पेन नीट चालत नव्हता अशी कारण देतो अगदी त्याप्रमाणे' असं म्हटलं होतं.
झारखंडमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच सुरू होतं अशी टीका केली होती. 'श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही पाहिलं असेल. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतदेखील त्याच परिस्थितीतून जात होता' असं मोदींनी म्हटलं होतं.