Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा दावा करणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत भाजपला ज्या राज्यावर सर्वात जास्त विश्वास होता, त्या उत्तर प्रदेशात पक्षाला मोठा धक्का बसला. यातही अजून धक्कादायक बाब म्हणजे, ज्या अयोध्येत भाजपने श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले, तिथेही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात लढवण्याचे काम केले. निवडणुकीत मोदीजी संविधान रद्द करण्याची भाषा बोलायचे, पण त्यांना देशातील जनतेने मतांमधून योग्य प्रत्युत्तर दिले. मोदी फक्त अदानी आणि अंबानींसाठी काम करतात, ते देशातील गरिबांसाठी काम करत नाहीत.
अयोध्येत भाजपचा पराभव झाला, उत्तर प्रदेशात पराभव झाला. ते हरले, कारण ते आयडिया ऑफ इंडियावर हल्ला करत होते. आपल्या संविधानात भारताला राज्यांचा संघ असे संबोधण्यात आले आहे. भारत हा राज्य, भाषा, इतिहास, संस्कृती, धर्म आणि परंपरा यांचा संघ आहे. नरेंद्र मोदींना देशातील जनतेने दाखवून दिले की, तुम्ही संविधानाशी छेडछाड करू शकत नाही.
काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, जेव्हा निवडणुका सुरू झाल्या, तेव्हा भाजपला पाठिंबा देणाऱ्या मीडियाने त्यांना 400 जागा मिळतील असे सांगितले. खुद्द पंतप्रधान 400 च्या पुढे जागा मिळण्याचा दावा करत होते. महिनाभरानंतर ते 300 पार म्हणू लागले, त्यानंतर 200 वर आले. निवडणुकीचा निकाल सर्वांनी पाहिला. ही काही सामान्य निवडणूक नव्हती. संपूर्ण मीडिया I.N.D.I.A च्या विरोधात होता. सीबीआय, ईडी आणि संपूर्ण प्रशासन आमच्या विरोधात होते. निवडणूक आयोगाने पंतप्रधानांना अनुकूल अशी निवडणूक रुपरेषा तयार केली. पंतप्रधानांचा वाराणसीत थोडक्यात विजय झाला आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.