नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०१४ पेक्षा मोठा विजय मिळवला. एनडीएने ३५० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून मोदींच्या झंझावातात माजी पंतप्रधानांसह १० माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला.
२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले.
एचडी देवेगौडा
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा देखील दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत आपला मतदार संघ वाचवू शकले नाहीत. तूमकूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या देवेगौडा यांना भाजपच्या बसवराज यांनी पराभवाची धुळ चारली.
शिला दीक्षित
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांना आपला मतदार संघ राखण्यात अपयश आले. त्या उत्तर-पूर्व दिल्ली मतदार संघातून निवडणूक लढवत होत्या. मनोज तिवारी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
भूपेंद्रसिंह हूड्डा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा मोदी लाटेत विजय मिळविण्यात अपयशी ठरले. ते रोहतकमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपच्या अरविंद कुमार शर्मा यांनी त्यांचा पराभव केला.
दिग्विजय सिंह
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रज्ञा सिंह ठाकूर हिने दिग्विजय सिंह यांना काट्याची टक्कर दिली. अखेर दिग्विजय सिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
बाबूलाल मरांडी
झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूला मरांडी या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. झारखंड मुक्ती मोर्चाचे बाबूलाल चार वेळ खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
हरिश रावत
काँग्रेसचे हरिश रावत यावेळी मोदींच्या झंझावातात पराभूत होताना दिसले. २०१४ ते २०१७ या कालावधीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले हरिश रावत यांना भाजपच्या अजय भट्ट यांनी मात दिली.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपला गड राखण्यात अपयश आले. २०१४ मध्ये नांदेडचा गड अबाधीत ठेवणारे अशोक चव्हाण यावेळी पराभूत झाले. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण यांचा पराभव केला.
सुशील कुमार शिंदे
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना आपला सोलापूर मतदार संघ राखण्यात यावेळीही अपयश आले. भाजपचे डॉ. जय सिद्धेश्वर यांनी शिंदे यांचा पराभव केला.
नवाम टुकी
काँग्रेसचे नेते आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नवाम टुकी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नवाम टुकी यांना किरण रिजीजू यांनी पराभूत केले.
विरप्पा मोइली
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांना देखील मोदी लाटेचा सामना करावा लागला. कर्नाटकच्या चिकबलपूरच्या मतदार संघातून त्यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे बीएन गौडा यांनी मोईलीला पराभूत केले.