Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजप नेते जोरदार प्रचार करत आहेत. अशातच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (12 मे) रोजी उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर निशाणा साधला आणि त्यांना 5 प्रश्नही विचारले.
राहुल गांधींना प्रश्न...अमित शाह म्हणतात, "मला राहुल गांधींना काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला तिहेरी तलाक परत आणायचा आहे का? तुम्हाला मुस्लिम पर्सनल लॉ परत आणायचा आहे का? तुम्ही भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन करता की नाही? तुम्ही श्रीराम मंदिरत दर्शनाला का गेला नाही? रायबरेलीतील नागरिक कलम 370 हटवण्याच्या निर्णयाल समर्थन देतात की नाही?" असे थेट प्रश्न अमित शाह यांनी राहुल गांधींना विचारले.
गांधी कुटुंबावर निशाणाउपस्थित लोकांना उद्देशून अमित शाह म्हणाला, "राहुल गांधी आज इथे मते मागण्यासाठी आले आहेत. तुम्ही इतकी वर्षे त्यांना मतदान करत आहात, तुम्हाला खासदार निधीतून काही मिळाले का? त्यांनी पूर्ण निधी खर्च केला, तुम्हाला मिळाला नाही, तर गेला कुठे? खासदारांचा 70% पेक्षा जास्त पैसा अल्पसंख्याकांवर खर्च करण्याचे काम सोनिया गांधींनी केले. अनेकांनी मला सांगितले की, ही एका कुटुंबाची जागा आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, मी माझ्या कुटुंबाकडे मते मागण्यासाठी आले आहे.
"रायबरेलीच्या लोकांनी गांधी-नेहरुंना संधी दिल, वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाचे इथे राज्य होते. निवडून आल्यानंतर सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंब किती वेळा रायबरेलीला आले? रायबरेलीत 3 डझनहून अधिक मोठे अपघात झाले, गांधी कुटुंब आले होते का? ते तुमच्या सुख-दु:खातही सामील होत नाहीत. तुम्ही अनेक वर्षे गांधी घराण्याला संधी दिली, विकासाची कामे झाली नाहीत. अमेठीनेही आम्हाला संधी दिली, आम्ही अमेठीचा विकास केला. काँग्रेसचा विकासावर विश्वास नाही. भाजपला संधी द्या, आम्ही रायबरेलीचा वेगाने विकास करू," असे आवाहनदेखील शाह यांनी केले.