पंजाब, निवडणूक वार्तापत्र: प्रसाद आर्वीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून तिथे सर्वाधिक ८ खासदार काँग्रेसचे आहेत. या राज्याच्या निवडणुका अखेरच्या टप्प्यात १ जूनला होणार आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये तयारी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी राजकीय पक्षांना मिळणार आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. २०२४च्या या निवडणुकीत काँग्रेसलाआपल्या ८ जागा कायम राखण्याचे, तर भाजपला आपली संख्या दोनवरून पुढे वाढविण्याचे आव्हान राहणार आहे. अवघ्या १३ जागा असलेल्या पंजाबची निवडणूक सर्वांत शेवटच्या टप्प्यात घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळावा, हाच यामागील सत्ताधारी पक्षाचा हेतू असावा, असा सूर विरोधी पक्षांकडून आळवला जात आहे.
- भाजप-शिअद युतीचे काय?
२०१९च्या निवडणुकीत भाजपची शिरोमणी अकाली दल पक्षासोबत युती होती. यंदा भाजप १३पैकी ५ जागांवर अडून बसल्याने युतीची गणिते अजून जुळलेली नाहीत. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखविंदरसिंह बादल यांनी पंजाबमध्ये रथयात्रा सुरू केली असून, ते जनमत आजमावत आहेत. या रथयात्रेचा समारोप झाल्यानंतर चंडीगड येथे शिरोमणी दलाची बैठक होईल. त्यात भाजपसोबत युती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
- आप, काँग्रेस स्वतंत्र
- पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपने पहिल्या यादीत आठ उमेदवारांची घोषणा करून बिगुल फुंकले आहे. - यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काही आमदारही रिंगणात उतरविले आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत...
- काँग्रेस- ८
- भाजपा- २
- शिअद- २
- आप- १