नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत एनडीए ३५२ जागांवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्तेत आले आहे. शनिवार सेंट्रल हॉल, नवी दिल्ली येथे एनडीएची बैठक पार पडली. बैठकीत नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी, अल्पसंख्याकांची भीती घालवून त्यांचा विश्वास मिळवणे हेच मुख्य आव्हान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास" असा आपल्या नवीन सरकारचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले. या बैठकीनंतर मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
अल्पसंख्याकांचा मतासाठी वापर करण्यात आला. त्यांना विकासापासून दूर ठेवण्यात आले आहे. आता त्यांचा विश्वास मिळवणे हेच मुख्य आव्हान असणार आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा आपला मंत्र असल्याचे मोदी म्हणाले. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचा संकल्प करुन त्यांना पुढे आणण्याचे काम करा असा सल्ला नवनिर्वाचित खासदारांना यावेळी मोदींनी दिला.
अल्पसंख्यांकाचे शिक्षण आणि जीवनमान सुधारण्याची चिंता आपल्याला असायला हवी. अल्पसंख्याकांच्या आपल्याला विश्वास जिंकायचा आहे. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्याकांना धोका आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. हे आपल्याला खोडून काढायचे आहे. आधीपासूनच गरीबांप्रमाणेच अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आला आहे. असा काल्पनिक भय निर्माण करुन त्यांना विकासापासून दूर ठेवण्यात आले असल्याचे मोदी म्हणाले .