चेन्नई - तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी दिवंगत सी.एन. अन्नादुराई व जयललिता यांना भारतरत्न आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकाला दिवंगत एम.जी. रामचंद्रन, यांचे नाव देण्याची मागणी पलानीस्वामी यांनी केली. तसेच आगामी 2019 च्या निवडणुकांसाठी भाजपला साथ देणार का ? या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान केले. त्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये नवा मित्र मिळण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमध्ये स्थानिक राजकीय पक्षाचे वचर्स्व मोठ्या प्रमाणात आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाचे 37 खासदार असल्याने तो तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर भाजपला केवळ 1 जागा जिंकता आली आहे. त्यामुळे दक्षिण भारतात आपले हात मजबूत करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, पलानीस्वामी यांनी मोदींची भेट घेतल्यामुळे या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच, आपण भाजपसोबत आघाडीचा निर्णय घेऊ, असे सूचक विधान एआयएडीएमकेचे नेते आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केलं. त्यामुळे दक्षिण भारतात भाजपला नवीन मित्रपक्ष मिळण्याची शक्यता असून तसे झाल्यास दक्षिणेत भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही आपण नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली होती. तर, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतील राजकारणात अनेक घडामोडी घडणार असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनीही तामिळनाडूच्या राजकारणात एंट्री केली आहे. 'मक्कल निधी मय्यम' नावाचा पक्ष स्थापन करुन कमल हसन यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे भाजपकडून दक्षिणेत नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपने हात दिल्यानंतर कोण साथ देणार हे पाहण्यासाठी निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे.