ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - लोकसभेच्या एका खासदाराने दिल्ली पोलिसांत हायप्रोफाईल महिलेने हनीट्रॅप केलं असल्याची तक्रार केली आहे. महिलेने घरी बोलावून पेयात गुंगीचे औषध मिसळून आपल्याला बेशुद्ध केलं, आणि त्यानंतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले असल्याचा आरोप खासदाराने केला आहे. महिला आता आपल्याला ब्लॅकमेल करत असून पाच कोटींची मागणी करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. खासदाराने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महिलेचा शोध सुरु करण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेसोबत अजून काही लोक सामील असून त्यांची एक गँग आहे. या गँगने खासदाराला धमकी दिली आहे की जर त्याने पाच कोटींची रक्कम दिली नाही, तर सर्व फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्यात येतील. इतकंच नाही तर बलात्काराच्या आरोपाखाली फसवण्याची धमकीही दिली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त मुकेश मीना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे.
आपल्या तक्रारीत खासदाराने दावा केला आहे की, आरोपी महिलेने त्यांच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर गाजियाबादमधील घरी चलण्यास सांगितलं होतं. तिथे पोहोचल्यावर गुंगीचं औषध मिसळलेलं शीतपेय दिलं, ज्यानंतर बेशुद्ध झालो. शुद्धीत आल्यानंतर आपल्याला फसवलं गेलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
These are all false allegations, I have full faith in law; will cooperate in the investigation: KC Patel, BJP MP on suspected honeytrap case pic.twitter.com/rRITI4RaVP— ANI (@ANI_news) May 1, 2017
खासदाराने तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्तांनी तात्काळ याप्रकरणी तक्रार नोंद करत तपास करण्याचा आदेश दिला. दिल्ली पोलिसांचं एक विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. गरज पडल्यास क्राईम ब्रांत किंवा स्पेशल सेलकडे हे प्रकरण सोपवलं जाऊ शकतं.