नवी दिल्ली : लोकसभेत बऱ्याच चर्चेनंतर बेकायदा प्रतिबंधक हालचाली (सुधारणा) विधेयक 2019(यूएपीए) मंजूर करण्यात आले. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक आहे. काँग्रेसकडून या विधेयकाला विरोध होत असला तरी 1967 मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार असताना हे विधेयक आणले होते, असे सांगत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.
यावेळी अमित शहा यांनी अर्बन नक्षलवादावर हल्लाबोल केला. अर्बन नक्षलवाद वाढवण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमचे सरकार त्यांना कोणतीही सहानुभूती दाखविणार नाही, असेही अमित शहा यांनी सांगितले.
दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचविणाऱ्यांना, आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवादाची थिअरी रुजवणाऱ्यांना दहशतवादी संबोधायचे की नाही? असा सवाल करत अमित शहा यांनी या विधेयकानुसार, दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याचबरोबर, दहशतवाद्यांवर कठोर कारवाईने नव्हे तर त्यांच्याशी चर्चा करूनच नियंत्रण आणले जाऊ शकते, या विचारांशी कोणीही सहमत नाही. एखाद्याकडे बंदूक असली म्हणजे तो दहशतवादी होत नाही, तर त्याच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात म्हणूनच तो दहशतवादी बनतो, असेही अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले.