स्मृती इराणींच्या संपत्तीत वाढ; 89 लाख रुपये बँक खात्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 09:31 AM2019-04-12T09:31:48+5:302019-04-12T09:32:39+5:30
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत स्मृती इराणी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते.
नवी दिल्ली : अमेठी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या शपथपत्रात 4.71 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्यावेळी निवडणुकीत त्यांची मालमत्ता फक्त 26.98 लाख रुपये इतकी होती.
स्मृती इराणी यांनी आपल्या शपथपत्रात 1.75 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2.96 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात 1.45 कोटी रुपये किमतीची शेतजमीन आणि 1.50 कोटी रुपयांची निवासी इमारत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, यानुसार 31 मार्चपर्यंत स्मृती इराणी यांच्याजवळ 6.24 लाख रोख रक्कम आणि बँक खात्यात 89 लाखहून अधिक रक्कम जमा आहेत. त्यांच्याजवळ राष्ट्रीय बचत योजना आणि पोस्ट खात्यात 18 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे. तर, 13.14 लाख रुपये इतक्या किमतीच्या गाड्या आणि 21 लाख रुपयांचे सोने आहे. याशिवाय, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच, त्यांच्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. याचबरोबर, 2014 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवताना स्मृती इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून 1994 मध्ये बीकॉम पार्ट-1 चे शिक्षण घेतल्याची माहिती होती. मात्र आता त्यांनी आपण 3 वर्षांचा कोर्स पूर्ण न केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
दरम्यान, स्मृती इराणी या अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.