लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 06:59 AM2024-01-04T06:59:07+5:302024-01-04T06:59:41+5:30
या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.
आदेश रावल -
नवी दिल्ली : काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. आघाडी समितीने त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविला.
या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.
जागा किती हा विषय नंतरचा
काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशाप्रकारे एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड केली. रस्त्यालगत जमिनीचा शेतकऱ्यांना चार ते पाच पट मोबदला मिळायचा त्या कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे याचे नेमके काय करणार याचे स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही. जागा किती हा विषय नंतरचा आहे.
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
दृष्टिकोन बदलला?
भाजपविरोधात एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवल्या आहेत. तेव्हाचे जागावाटप बघता काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला असेल तर आम्हाला माहित नाही.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कुठे ठरला जागांचा फॉर्म्युला?
काँग्रेसचे संयोजक मुकुल वासनिक, सलमान खुर्शिद, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मोहन प्रकाश या आघाडी समितीने देशातील प्रदेश काँग्रेस नेत्यांशी २९-३० डिसेंबर या दोन दिवसांमध्ये चर्चा केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी २७ जागांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र जागावाटपाच्या वाटाघाटीची सुरुवात २१-२२ जागांपासून सुरू करण्यात येणार आहे. चर्चेअंती दोन-तीन जागांवर पाणी सोडण्यासही पक्ष तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकसभेची तयारी सुरू; राष्ट्रवादीस कमी जागा, आंबेडकर, शेट्टींना स्थान
‘वंचित’बाबत खरगे निर्णय घेतील. प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा व्हावी, असे शरद पवार यांचे मत होते; पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे घेतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशीच चर्चा करा.
यावरून खलबते
जागावाटपात मिलिंद देवरा यांची मुंबईतील जागा अडकली आहे. येथे शिवसेनेचे खासदार आहेत. राजू शेट्टी यांच्या पक्षाला एक जागा देण्यात येणार असली, तरी ही जागा काँग्रेसच्या कोट्यातून कमी करण्यात येईल.