घाबरू नका, न डगमगता स्ट्राँगरुमबाहेर खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 09:13 AM2019-05-21T09:13:49+5:302019-05-21T09:31:24+5:30
गेल्या रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : लोससभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना स्ट्राँगरुमबाहेर खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी अफवा आणि एक्झिट पोलवरुन घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, असे प्रियंका गांधी यांनी एका ऑडिओमार्फत जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, अशा अफवा कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, म्हणून यासंबंधी सावधानता अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पाच वाजता संपल्यानंतर, देशभरातील राजकीय वर्तुळात ज्याची प्रचंड उत्सुकता होती, ती म्हणचे एक्झिट पोल. विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सींनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून आणि तज्ज्ञांची मतं घेऊन जनतेचा कौल कुणाला, याचा अंदाज बांधला आहे. स्वाभाविकच, प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. परंतु, देशात 'फिर एक बार, मोदी सरकार' येईल, असेच बहुतांश एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडेल किंवा नाही, हे कुठल्याच एक्झिट पोलमध्ये सांगितले नाही. मात्र, भाजपाप्रणित एनडीए 300 जागांपर्यंत मजल मारू शकेल असे चित्र दिसत आहे.
'लोकमत'च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत पाच प्रमुख एक्झिट पोलचे आकडे.
संस्था | भाजपा+ | काँग्रेस+ | अन्य |
टाइम्स नाउ-व्हीएमआर | 306 | 132 | 104 |
सी व्होटर | 287 | 128 | 127 |
जन की बात | 305 | 124 | 113 |
एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 140 |
न्यूज नेशन | 282-290 | 118-126 | 130-138 |