हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:00 AM2024-07-02T06:00:05+5:302024-07-02T06:00:31+5:30
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लाेकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ
नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करीत ‘भाजपचे हे लोक हिंदू नाहीत’ असे वक्तव्य केले. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या मुद्द्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही; परंतु भाजपने युवक, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केली; परंतु अल्पसंख्याक या देशाच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे आहेत. हा अहिंसेचा देश आहे, भीतीचा नाही. भगवान शिव म्हणतात- घाबरू नका, घाबरवू नका. ते अहिंसेबद्दल बोलतात. जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा आणि द्वेषावर बोलतात. तुम्ही (भाजप) हिंदू असूच शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राहुल गांधींना उत्तर देणार
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पुढे सरसावणार आहेत. या आरोपांना ते मंगळवारी लोकसभेत उत्तर देणार आहेत. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारवर लोकसभेत जोरदार हल्ला चढविला. त्यानंतर राहुल यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी सरकारचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव आणि किरेन रिजिजू हे पत्रकार परिषद घेण्यासाठी पुढे आले.
सरकारच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी स्वतः मंगळवारी लोकसभेत राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देणार आहेत. राजनाथ सिंह, अमित शाह, पीयूष गोयल यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी चर्चा केली आहे.
हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब : पंतप्रधान
राहुल गांधी यांच्या दाव्यांचे खंडन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनदा त्यांच्या जागेवरून उठले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” अग्निवीरांच्या मृत्यूनंतर त्यांना शहीद दर्जा मिळत नाही, असा आरोपही गांधी यांनी केला. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निवीराच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद असल्याचे निदर्शनास आणून दिले.
भगवान शंकराची अभय मुद्रा
राहुल गांधींनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवून भगवान यांच्याकडून सत्य, धैर्य आणि अहिंसेची प्रेरणा मिळते, भगवान म्हणतात घाबरू नकोस, घाबरवू नकोस, असे सांगितले. भगवान शिवाच्या ‘अभय मुद्रे’चा उल्लेख करून ते म्हणाले की, ही मुद्रा इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मांमध्ये दिसते.
राहुल गांधींनी माफी मागावी : अमित शाह
“विरोधी पक्षनेते म्हणतात की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहीत नाही की, कोट्यवधी लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात, ते सगळे हिंसाचार करतात का? त्यांनी (राहुल) माफी मागितली पाहिजे. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश दहशतीत होता.
आणीबाणीच्या काळात वैचारिक दहशत होती. त्यांच्या (काँग्रेस) राजवटीत दिल्लीत हजारो शीख बांधवांची हत्या करण्यात आली,” असे अमित शाह म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. हा ठेका भाजपचा नाही.”
भाषणाची पडताळणी करणार : ओम बिर्ला
राहुल यांच्या भाषणाच्या शेवटी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींनी सांगितलेल्या अनेक गोष्टी तथ्यहीन आणि खोट्या आहेत. या गोष्टींची पडताळणी करण्याची विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. पडताळणी केली जाईल, असे बिर्ला यांनी सांगितले.