लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं आहे. या भाषणादरम्यान, राहुल गांधी यांनी हिंदूंचे दैवत असलेल्या शिवशंकराच्या अभयमुद्रेचा उल्लेख केला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या हिंसक हिंदू आणि अभयमुद्रा या उल्लेखांमुळे वादाला तोंड फुटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये भाजपाचा उल्लेख लोकांना घाबरवणारा आणि हिंसक पक्ष असा केला. आपल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी सांगितले की, अभयमुद्रेचा संकेत भगवान शिव, गुरू नानक, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि भगवान महावीर यांनीही दिलेला आहे. कुराणामध्येही घाबरू नका, असा उल्लेख असल्याचा दावा केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या अभयमुद्रेबाबतच्या विधानाला मुस्लिम धर्मगुरूंनी विरोध केला आहे. इस्लाममध्ये याचा कुठलाही उल्लेख नाही आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांचं विधान मागे घेतलं पाहिजे.
राहुल गांधी यांनी अभय मुद्रेचा इस्लामसोबत उल्लेख केल्यानंतर अजमेर शरीफचे हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी एएनआयला सांगितले की, आम्ही राहुल गांधींचं भाषण ऐकलं आहे. त्यांनी इस्लाममधील प्रार्थनांशी अभयमुद्रेला जोडले आहे. तसेच इस्लाममध्ये या मुद्रेचा उल्लेख असल्याचा दावा केला आहे. मात्र असा उल्लेख आमच्या धार्मिक पुस्तकांमध्ये आणि इस्लामच्या शिकवणीमध्ये कुठेही लिहिलेला नाही. कुठल्या धर्मामध्ये कुठली चिन्हे आहेत, याची राहुल गांधी यांना माहिती असली पाहिजे, असेही चिश्ती पुढे म्हणाले.
दरम्यान, काल राहुल गांधी यांनी भाषणामध्ये ज्या अभयमुद्रेचा उल्लेख केला ती अभयमुद्रा म्हणजे ज्यामध्ये तुम्ही भयरहित असता. अभय मुद्रेचा शाब्दिक अर्थ निर्भयतेचा इशारा असाही होतो. अभयमुद्रा ही एक अशी मुद्रा आहे जी भीतीपासून मुक्ती आणि सुरक्षेची भावना दर्शवते. भारतामधील सर्व धर्मांच्या प्रतिमांमध्ये तुम्हाला अशा प्रकारची मुद्रा दिसून येते. या मुद्रेमध्ये उजवा हात वर करून, तळहात बाहेरच्या बाजूला दाखवला जातो. ही सर्वात प्राचीन मुद्रांपैकी एक मुद्रा आहे. अभय मुद्रा सुरक्षा, संरक्षण, शांती आणि आश्वासनाचं प्रतीक आहे. या मुद्रेचा उपयोग हा योग आणि ध्यानादरम्यान केला जातो.