लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर सुरू झालेल्या संसदेचं अधिवेशन वादळी ठरत आहे. दरम्यान, विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी हे भाषणासाठी उभे राहिल्यावर त्यांचा माईक बंद केला जातो, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे. शुक्रवारी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि दीपेंद्र हुड्डा यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.
ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना सांगितले की, पीठासीन अधिकारी माईक बंद करतात, असा आरोप बाहेर जाऊन केला जातो. तुम्ही खासदार होऊन अनेक वर्ष झाली आहेत. तुमच्याकडे अनुभव आहे. तुम्ही जुन्या सभागृहात होता आणि नव्या सभागृहातही आहेत. तुम्हाला माहिती असेल की माईकचा रिमोट हा अध्यक्षांच्या आसनाजवळ नसतो. कुठल्याही पक्षाचा सदस्य असो, अशा प्रकारचा आरोप करू शकत नाही.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांचाही उल्लेत केला. ते म्हणाले की, सुरेशजी इथे बसतात, त्यामुळे इथे कुठला कंट्रोल आहे का, हे त्यांनाही विचारा. त्यानंतर ओम बिर्ला यांनी के सुरेश यांनाही लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ कुठलं बटण आहे का, असं विचारलं. त्यावर सुरेश यांनी तसं कुठलं बटण नसल्याचं सांगितलं. त्यानंतर ओम बिर्ला म्हणाले की, पाहा इथे कुठलंही बटण नाही आहे. या आसनावरून केवळ व्यवस्था दिली जाते. आम्ही माईक बंद करत नाहीत. या आसनावरून व्यवस्थेनुसार माईकचा कंट्रोल चालतो.
लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून चर्चेची मागणी करत असताना त्यांच्या माईक बंद केला गेला, असा आरोप काँग्रेसकडून शुक्रवारी करण्यात आला होता. त्यानंतर कांग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर करून जिथे एकीकडे नरेंद्र मोदी हे नीटच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत, त्यावेळी राहुल गांधी हे तरुणांचा आवाज सभागृहात उपस्थित करत आहेत. मात्र अशा गंभीर विषयावर माईक बंद करण्यासारखं कृत्य करून तरुणांचा आवाज दाबण्याचा कट आखला जात आहे, असा आरोप केला, होता.