नवी दिल्ली: १३ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला.
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षेतल्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाने ही करावई केली आहे.
बुधवारी संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संसद परिसरात मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे. इतकेच नाही तर बुधवारी लोकसभा सचिवालयाने खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची 'स्मार्ट कार्ड' तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभा लॉबी आणि संसदेच्या संकुलातील इतर काही ठिकाणी फेशियल रेकग्निशन सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आली. सचिवालयाने म्हटले आहे की, अनेक सदस्यांकडे स्मार्ट कार्ड आहेत, ज्यांनी व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टमसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती करून घ्यावी. याशिवाय पुढील आदेश येईपर्यंत व्हिजिटर पास बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. संसदेच्या आत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. टोपी व बूट काढून तपासणी केली जात आहे.
संसदेत फोडलेला स्मोक क्रॅकर नेमका काय?
संसदेत तरुणांनी स्मोक क्रॅकर उडविण्याचा प्रयत्न केला. हा स्मोक क्रॅकर एक फटाका आहे. उत्सवामध्ये या फटाक्याचा वापर करण्यात येतो. तो आणीबाणीच्या स्थितीत सिग्नल देण्यासाठीही उपयोगात आणला जातो. स्मोक क्रॅकर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फटाका खूप हानीकारक नसतो पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास स्मोक क्रॅकर धोकादायक ठरू शकतो. तो एखाद्या ग्रेनेडसारखा दिसतो. स्मोक क्रॅकर फटाक्याची किंमत ५०० ते २००० रुपये आहे. संसदेत दोन तरुणांनी जो स्मोक क्रॅकर आणला होता, त्याच्यातून पिवळा धूर येत होता. नौदल, भूदलामध्ये सिग्नल देण्यासाठी स्मोक क्रॅकरचा वापर करतात. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांकडेही स्मोक क्रॅकर असतात.