Security Breach in Lok Sabha: आज संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक घडली. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून अचानक दोन तरुणांनी सभागृहात उडी मारली अन् गोंधळ घातला. यासोबतच सभागृहात स्मोक बॉम्बही फोडला. यावेळी भाजप खासदार मनोज कोटक, मलूक नागर आणि इतर काही खासदारांनी त्यांना पकडले. काही वेळातच सुरक्षा रक्षकांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, दोन तरुणांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते बाकावर चढले आणि स्मोक बॉम्बही फोडला. सुरुवातीला आमच्या काही सहकारी खासदारांनी त्यांना पकडले. त्यानंतर सुरक्षा अधिकारी त्या दोघांना बाहेर घेऊन गेले. ही निश्चितच सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे.
विशेष म्हणजे, आज 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याला बावीस वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी पुन्हा संसदेत अशाप्रकारची घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्ररणी दिल्ली पोलिसांनी दोन तरुणांसह एका महिलेला ताब्यात घेतले आहे. नीलम सिंह, अमोल शिंदे आणि सागर शर्मा अशी तिंघांची नावे आहेत. नीलम(वय42) हरियाणातील हिसारची रहिवासी आहे, तर अमोल शिंदे (वय 25) महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहेत. तिसऱ्याची माहिती समोर आलेली नाही.
नेमकं काय घडलं?नेहमीप्रमाणे आज संसदेचे कामकाज सुरू होते. यावेळी अचानक एकाने लोकसबेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तर, सभागृहाबाहेरही इतर दोघांनी स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार, सागरने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उडी मारली, तर अमोल आणि नीलम यांनी संसदेबाहेर स्मोक बॉम्ब फोडला. यावेळी तिघांनाही अटक करण्यात आली असून, दिल्ली पोलीस आणि आयबी त्यांची चौकशी करत आहे.