Lok Sabha Security Breach Pratap Simha Reaction: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेच्या त्रुटीवरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, ज्या भाजप खासदाराच्या पासवर आरोपी संसदेत शिरले होते, ते भाजप खासदार प्रताप सिम्हा (Pratap Simha) यांनी रविवारी (24 डिसेंबर) पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले.
विरोधी पक्ष सातत्याने खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. या प्रकरणावर बोलताना प्रताप सिम्हा म्हणाले की, मी देशद्रोही आहे की नाही, हे देव आणि मतदार ठरवतील. 'देशद्रोही' पोस्टरबाबत बोलताना ते म्हणाले की, मी देशभक्त आहे की देशद्रोही, हे जनता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठरवेल.
प्रताप सिम्हा पुढे म्हणतात, मी देशद्रोही आहे की देशभक्त, हे म्हैसूरच्या टेकड्यांवर बसलेली माता चामुंडेश्वरी आणि ब्रह्मगिरीवर बसलेली माता देवी कावेरी ठरवेल. गेल्या साडेनऊ वर्षांपासून मैसूरू आणि कोडगूचे लोक माझे काम पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीत धर्म आणि राष्ट्रवादाशी संबंधित मुद्द्यांवर मतदान होईल. जनताच निकाल देईल. मी सर्व काही त्यांच्या निर्णयावर सोडले आहे. यावर मला आणखी काही बोलायचे नाही.
प्रताप सिम्हा यांचा जबाब नोंदवलासंसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी (22 डिसेंबर) सांगितले होते की, संसद सुरक्षा भंग प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून प्रताप सिम्हा यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संसदेच्या सभागृहात स्मोक कँडल फोडणाऱ्या सागर शर्मा आणि मरोरंजन डी, या दोन आरोपींना प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयातून पास देण्यात आला होता. यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.