नवी दिल्ली - Narendra Modi in loksabha ( Marathi News ) घराणेशाहीमुळे देशाचं खूप नुकसान झाले आणि काँग्रेसचेही नुकसान झाले. काँग्रेसचे खरगे लोकसभेतून राज्यसभेत गेले. गुलाब नबी आझाद पक्षातून दूर झाले. हे सर्व घराणेशाहीचे बळी ठरले. एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च करण्याच्या नादात काँग्रेसचं दुकान बंद करण्याची वेळ आली अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर घणाघात केला. त्यासोबत भाजपाच्या घराणेशाहीवर होणाऱ्या टीकेवरही पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण दिले.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. त्यावेळी मोदी म्हणाले की, आम्ही कोणत्या घराणेशाहीवर बोलतो? जर कुठल्याही घराण्यात जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर एका पेक्षा अधिक लोक राजकारणात प्रगती करत असतील तर त्याला आम्ही घराणेशाही म्हटलं नाही. आम्ही अशा घराणेशाहीवर बोलतो जो पक्ष घराणेशाहीवर चालतो. जो पक्ष घराण्यातील लोकांना प्राधान्य देतो. पक्षाचे सर्व निर्णय घराण्यातील लोकच करतात ही घराणेशाही आहे. ना राजनाथ सिंह, ना अमित शाह यांचा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ज्या एकच घराणेशाही पक्ष चालवत असतो ते लोकशाहीत योग्य नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत एका कुटुंबातील दहा लोकांनी राजकारणात आले त्यात गैर नाही. युवकांनी राजकारणात यावे असं आम्हालाही वाटते. घराणेशाहीवर चर्चा व्हावी हे आम्हालाही वाटते. हा तुमचा आणि आमचा विषय नाही. देशातील लोकशाहीसाठी पक्षातील घराणेशाहीचं राजकारण हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यासाठी मी कुठल्याही घराण्यातील २ लोक प्रगती करत असतील तर मी त्याचे स्वागत करेन, १० लोक प्रगती करतील त्यांचे स्वागत आहे. देशात नवीन पिढी पुढे यायला लागली तर स्वागतच आहे. पण घराणेशाहीच पक्ष चालवणार, एक अध्यक्ष झाल्यानंतर त्याचा मुलगा अध्यक्ष, त्यानंतर त्याचा मुलगा अध्यक्ष होणार हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.
देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज
काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली. १० वर्ष खूप जास्त आहे. परंतु १० वर्षात ही जबाबदारी सांभाळण्यात काँग्रेस अपयशी ठरले. इतकेच नाही तर विरोधकांमध्ये क्षमता असणारे अनेकजण आहे त्यांना दडपून टाकले. संसदेत अनेक युवा खासदार बोलले तर कदाचित इतरांची प्रतिष्ठा कमी होईल असं काँग्रेसला वाटतं. म्हणून युवा खासदारांना बोलून दिले जात नाही. काँग्रेसच्या या वृत्तीमुळे विरोधी पक्षाचे, संसदेचे आणि देशाचे नुकसान झाले. देशाला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. राष्ट्रपतींचे भाषण वास्तव्याशी निगडीत दस्तावेज असतो, जो देशासमोर ठेवला जातो. राष्ट्रपतींनी ४ मजबूत स्तंभाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. हे ४ घटक जितके मजबूत होतील तितकाच आपला देश समृद्ध आणि वेगाने विकसित होईल. नारीशक्ती, युवाशक्ती, गरिब आणि शेतकरी यावर राष्ट्रपतींनी भाष्य केले. या ४ घटकांच्या सशक्तीकरणामुळे भारताला मजबूत राष्ट्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे राष्ट्रपतींच्या भाषणावर सकारात्मक चर्चा व्हायला हवी होती. परंतु कधीपर्यंत समाजात विभाजन करणार?, देशाला खूप तोडले. दरवेळीप्रमाणे विरोधकांनी देशाला निराश केले. विरोधकांची ही अवस्था पाहून लोक त्रस्त आहे. नेते बदलले पण टेप रेकॉर्डर तोच आहे. निवडणुकीचं वर्ष आहे काहीतरी नवीन आणायला हवे. मात्र त्यातही विरोधक अपयशी ठरलेत. विरोधकांच्या या अवस्थेला जबाबदार काँग्रेस पक्ष आहे अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था भारत बनेल
काँग्रेस एका घराण्यात गुंतत गेली. घराण्याच्या बाहेर बघण्याची सवय नाही. काँग्रेसमध्ये कॅन्सल कल्चर आला आहे. आम्ही मेक इंन इंडिया बोललो, तर काँग्रेस म्हणतं, कॅन्सल, वोकल फॉर लोकल, वंदे भारत, संसदेची नवी इमारत प्रत्येक गोष्टीला कॅन्सल म्हटलं जाते. हा देशाचा विकास आहे मोदींचा नाही. किती द्वेष मनात ठेवणार? ज्या गतीने भारत विकास करतोय, जग त्याची दखल घेत आहे. आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक ताकद बनणार आहे. ही मोदीची गॅरंटी आहे. जेव्हा आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू असं बोलतो तेव्हा विरोधक यात काय, हे आपोआप होईल असं म्हटलं जाते. मी सरकारची भूमिका काय असते हे सभागृहाच्या माध्यमातून देशाला आणि विशेषत: युवा शक्तीला सांगतो. १० वर्षापूर्वी २०१४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट आलं होतं, तेव्हा सरकार कोणाचे होते हे देशाला माहिती आहे. अंतरिम बजेट सादर करताना तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं अर्थव्यवस्था ११ व्या नंबरवर पोहचली तेव्हा गर्व होत असल्याचं म्हटलं पण आज भारत ५ व्या नंबरवर आहे. २०४४ पर्यंत भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल असं तेव्हाच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं. ३० वर्षाची वाट काँग्रेसनं पाहायला लावली. परंतु आज आम्ही सांगतोय, ३० वर्ष लागणार नाही तर मोदी गॅरंटी आहे. आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणारच. ११ वर पोहचल्यावर तुम्ही खुश होता मग आता देश पाचव्या नंबरवर असतानाही तुम्हाला आनंद वाटायला हवा. भाजपा सरकारच्या कामाचा वेग, लक्ष आणि स्वप्न किती मोठी असतात हे आज जग बघत आहे असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.