नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत लोकसभेत टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे. त्यामुळे आता मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. या अविश्वास प्रस्तावावर येत्या शुक्रवारी चर्चा होणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत. सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे.