लोकसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्याचे केंद्रातील सत्ताधारी एनडीएचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीतलोकसभा अध्यक्षपदाबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे सत्ताधारी एनडीएचे लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीने के. सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. आता २६ जून रोजी लोकसभेचं कामकाज सुरू होताच सकाळी ११ वाजता काळजीवाहू अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान घेतील.
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचे उमेदवार असलेले भाजपा नेते ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर इंडियाचे उमेदवार के. सुरेश हे केरळमधील मवेलिकारा मतदारसंघातून आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात होत असलेल्या लढतीत कुणाचं पारडं जड आहे आणि लोकसभेतील आकडे कुणाच्या बाजूने आहेत. याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
५४३ सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेमध्ये सध्या ५४२ खासदार आहेत. केरळमधील वायनाड येथील सदस्यत्वाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा एक सदस्य कमी झालेला आहे. लोकसभेमध्ये सत्ताधारी एनडीएकडे २९३ सदस्यांसह स्पष्ट बहुमत आहे. तर इंडिया आघाडीकडे २३३ सदस्य आहेत. त्याशिवाय कुठल्याही आघाडीत सहभागी नसलेल्या सदस्यांची संख्या १६ आहे. आता तटस्थ असलेल्या या सर्व खासदारांनी इंडियाला पाठिंबा दिला तरी इंडियाचा आकडा हा २४९ पर्यंतच पोहोचू शकतो. मात्र विजयी होण्यासाठी २७१ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.
एकूणच लोकसभेतील संख्याबळ हे एनडीएच्या बाजूने असल्याने ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा सभापती बनण्याच्या शर्यतीत के. सुरेश यांच्या तुलनेमध्ये पुढे आहेत. ओम बिर्ला हे २०१४ मध्ये कोटा येथून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांनी एकमताने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ओम बिर्ला हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
दरम्यान, जर एनडीएमधील टीडीपी आणि जेडीयू यांनी काही धक्कादायक निर्णय घेतला तरच इंडिया आघाडीला लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही प्रमुख पक्षांनी भाजपाच्या ओम बिर्ला यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देत असलेल्या मायावती यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत अद्याप सक्रिय सहभाग घेतलेला नाही. उमेदवाराच्या निवड प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या २९ खासदासांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर इंडियाचं संख्याबळ २०४ पर्यंत खाली येऊ शकतं.