Lok Sabha Speaker Election : १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत मतदान होणार आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे खासदार के सुरेश मैदानात आमनेसामने आले आहेत. अशातच समाजवादी पक्ष, काँग्रेसच्या सात खासदारांनी अद्याप खासदारकीची शपथ घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यापासून दोन दिवस खासदारांना शपथ देण्यात आली. पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब आणि त्यांचे सहकारी पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकसभा खासदारांना शपथ दिली. मात्र, अद्याप सात खासदार बाकी आहेत ज्यांनी शपथ घेतली नाही. यामध्ये काँग्रेस, सपा आणि टीएमसी या पक्षांचा समावेश आहे. या सात खासदारांनी शपथ न घेतल्याने त्यांना आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाहीये. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये एनडीएच्या एकाही खासदाराचा समावेश नाहीये. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता विरोधी पक्षाने २३२ जागा जिंकल्या असताना, त्यांच्या गटातील पाच खासदारांची उणीव भासणार असून ती संख्या २२७ पर्यंत खाली येणार आहे. लोकसभा अध्यपदाच्या निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा २६९ असणार आहे. तर दुसरीकडे २९३ खासदार असणाऱ्या एनडीएला वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या चार खासदारांचाही पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एनडीएच्या खासदारांची संख्या २९७ होण्याची शक्यता आहे.
शपथ न घेणारे खासदार कोण?
ज्या सात खासदारांनी शपथ घेतली नाही त्यात काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर, तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी, शत्रुघ्न सिन्हा आणि हाजी नूरुल इस्लाम यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष खासदार अभियंता रशीद आणि खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले अमृतपाल यांचीही नावे या यादीत आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून निवडून आलेले लोकसभेचे खासदार अफजल अन्सारी यांनी मंगळवारी संसदेत शपथ घेतली नाही. न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत शपथ घेण्यात आली नाही. समाजवादी पक्षाच्या खासदाराने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अफजल अन्सारी हे मुख्तार अन्सारी यांचे ते मोठे भाऊ आहेत. मात्र या खासदारांचा शपथविधी का प्रलंबित आहे, हे उघड होऊ शकले नाही.