लोकसभा निवडणुकीत भाजपाचं बहुमत हुकल्यानंतर देशातील राजकारणामधील अनेक समिकरणं बदलली आहेत. तसेच आतापर्यंत मागच्या दहा वर्षांत बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसने आक्रमक चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी लावून धरत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडियाचे के. सुरेश यांच्यात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ह्या नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोर्चा सांभाळत ममता बॅनर्जींशी चर्चा केल्याने ही नाराजी दूर झाली आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या मतदानापूर्वी इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी के. सुरेश यांना उमेदवारी देताना आपलं मत विचारात घेण्यात आलं नाही, असा दावा करत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पाठिंब्याच्या पक्षावर सहीसुद्दा केली नव्हती. सद्यस्थिती लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचे २३३ खासदार आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसच्या २९ खासदारांचा समावेश आहे. खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने ९९ सदस्य असलेल्या काँग्रेसपाठोपाठ तृणमूल हा इंडिया आघाडीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे सभागृहात इंडियासाठी ममता बॅनर्जी यांची साथ महत्त्वाची आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांनी नाराजी दूर करण्याची जबाबदारी स्वत:वर घेत त्यांना फोन लावला. सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेमध्ये ममता बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्यात राहुल गांधी यांना यश आलं.
या चर्चेमध्ये के. सुरेश यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याबाबतची माहिती न दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसची माफी मागितली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी आपल्या पक्षाचे दोन प्रतिनिधी पाठवले. मात्र यापेक्षा अधिक चांगला समन्वय आणि संवाद आवश्यक असल्याचेही तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी यांना सुनावण्यात आले. तसेच तृणमूल काँग्रेस पक्ष के. सुरेश यांच्या बाजूने मतदान करेल, असं आश्वासनही तृणमूल कांग्रेसने दिलं.