Om Birla Angry on Rahul Gandhi: काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर संसदेत बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी सभागृहाचे कामकाज ‘असंसदीय लोकशाही पद्धतीने’ चालवले जात असल्याचा आरोप केला. महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी वारंवार केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यानंतर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या सभागृहातील वागणुकीवरुन चांगलेच सुनावलं. सर्व सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा आणि परंपरा पाळणे अपेक्षित असल्याचे ओम बिर्ला म्हणाले.
राहुल गांधी यांनी लोकसभेत बहीण आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांच्या गालावर लाडाने हात फिरवत होते. यावरुन लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचा उल्लेख न करता सभागृहाच्या मर्यादा राखल्या पाहिजेत असं म्हटलं. भाजपनेही हा व्हिडीओ पोस्ट करुन काँग्रेसने या बालिश माणसाला आपल्यावर लादले आहे हे खरोखरच दुर्दैवी असल्याचे म्हटलं. व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे बहीण प्रियंका गांधी यांच्या जवळ उभे राहिलेले दिसत आहे. त्यानंतर त्यांनी लाडात प्रियंका गांधी यांच्या गालाला हात लावला.
त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे नियम व मर्यादेचं भान ठेवलं पाहिजे असं म्हटलं. "सभागृहातील सदस्यांनी सभागृहात शिष्टाचाराचे पालन करणे अपेक्षित आहे. अशा अनेक घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत की, ज्यात सभासदांचे वर्तन सभागृहाच्या परंपरा आणि मानकांना अनुसरून नाही. या सभागृहात वडील-मुलगी, आई-मुलगी आणि पती-पत्नी सदस्य आहेत. यासंदर्भात, नियम ३४९ अन्वये नियमानुसार विरोधी पक्षनेत्याने नियमानुसार सभागृहात स्वतःचे कामकाज करावे. सभागृहातील विरोधी पक्षनेत्याने योग्य आचरण ठेवणे अपेक्षित आहे," असं ओम बिर्ला म्हणाले.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. "लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सभागृहातील नियम समजावून सांगावे लागले हे फार लज्जास्पद आहे. काँग्रेसने या बालीश व्यक्तीला आपल्यावर लादलं आहे हे फार दुर्देवी आहे," असं अमित मालवीय म्हणाले.