लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू आहे. या पहिल्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर, सभापती ओम बिर्लाकाँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर जबरदस्त भडकले. केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते शशी थरूर खासदारकीची शपथ घेऊन परतताना हा संपूर्ण प्रकार घडला.
नेमकं काय घडलं? -घडले असे की, संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, जय संविधान, अशी घोषणा दिली. यानंतर थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले, संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे. सभापतींच्या या वक्तव्यावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा उभे राहिले आणि म्हणाले, यावर आपण आक्षेप घ्यायला नको होता सर...
यावर सभापती ओम बिरला हुड्डांवर भडकले आणि म्हणाले, "कशावर आक्षेप असावा आणि कशावर नसावा, सल्ला देत जाऊ नका. चला बसा." आता यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही आक्षेप घेत एक्सवर पोस्ट केली आहे. प्रियांका यांनी एक्सवर पोस्ट करत, भारताच्या संसदेत 'जय संविधान' म्हणता येत नाही? असा सवाल केला. सभापतींच्या आक्षेपावर नाराजी व्यक्त करत, संसदेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांना असंसदीय आणि असंवैधानिक घोषणा देतांना रोकले गेले नाही. मात्र, विरोध पक्षाच्या खाजदाराने 'जय संविधान' म्हटले म्हणून आक्षेप घेण्यात आला.