- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीलोकसभा आणि देशातल्या तमाम राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, याबाबत देशातल्या राजकीय पक्षांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर या संकल्पनेला आयोगाचा पाठिंबा आहे, असे मत व्यक्त करीत, दोन्ही निवडणुका ५ वर्षात एकदा व एकाच वेळी आयोजित करण्यास आयोगाची तयारी असल्याची भूमिका निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुका संभवत: जानेवारीत घेण्याचे संकेत त्यांनी दिले.निवडणुका एकाच वेळी आयोजित करण्याबाबत हेच मत निवडणूक आयोगाने मे महिन्याच विधी मंत्रालयाच्या स्थायी समितीला लेखी स्वरूपात कळवले आहे. ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी तर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे याच संकल्पनेचा पुरस्कार केला होता. आयोगाच्या ताज्या भूमिकेमुळे दोघांच्याही मताला एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.भारतात दरवर्षी वेगवेगळया राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने निवडणुकांच्या प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. या निमित्ताने लागू होणाऱ्या आदर्श आचार संहितेमुळेही गुड गव्हर्नन्स संकल्पनेत मोठे अडथळे निर्माण होत असून सरकारचे कामकाज वारंवार खोळंबते. ही कारणे अधोरेखित करीत, केंद्रीय विधी मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा पुरस्कार केला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत स्थायी समितीकडे आपली अनुकूलता नोंदवतांना निवडणूक आयोगाने या अवाढव्य निवडणुकांसाठी ईव्हीएम, तसेच व्होटर व्हेरिफायेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हिव्हिपॅट) मशिन्सची संख्या मोठया प्रमाणात वाढवावी लागेल, असे स्पष्ट केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यासाठी ९२८४.१२ कोटी रूपयांचा खर्च येईल. दर १५ वर्षांनी मशिन्स बदलावी लागतील. हा खर्च वारंवार होईल. एकत्रित निवडणुकांसाठी अन्य साधनसामुग्री, मनुष्यबळ तसेच बंदोबस्तासाठी फौजफाटा व आर्थिक तरतूदींबाबतही आयोगाने काही मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत. म्हणून विस्कटले वेळापत्रक- लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना नवी नाही. १९५२ साली लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. त्यानंतर १९५७, १९६२ व १९६७ अशा तीन सार्वत्रिक निवडणुकांमधे दोन्ही निवडणुकांचे मतदान एकाच वेळी झाले.
लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी
By admin | Published: September 28, 2016 1:11 AM