Lok Sabhe Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी(दि.3) राजधानी दिल्लीत भाजपच्या मंत्री परिषदेची बैठक झाली. ही बैठक सुमारे 8 तास चालली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला. तसेच, डीपफेक व्हिडिओ आणि ऑडियोपासून सावध राहण्यासही सांगितले.
या बैठकीत पीएम मोदी सुमारे तासभर बोलले. यावेळी ते म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कोणालाही भेटताना विचारपूर्वक भेटा, विचारपूर्वक बोला. तुम्हाला बोलायचे असेल तर सरकारच्या योजनांवर बोला. सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही सरकारने केलेल्या विकासकामांचा जनतेसमोर उल्लेख करा, अशा सूचना मोदींनी आपल्या नेत्यांना दिल्या.
कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षी जूनमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प विकसित भारत दर्शवणारा असला पाहिजे. 2047 पर्यंत भारत विकसित देश कसा बनू शकतो, याविषयी सचिवांनी पंतप्रधानांना पाच सादरीकरणे दाखवली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी, किरेन रिजिजू, अर्जुन मेघवाल आणि पियुष गोयल यांनी सादरीकरणावर पंतप्रधान मोदींना आपल्या सूचना मांडल्या. भाजप आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्राच्या उपलब्धी आणि विकास योजनांवर भर देणार आहे. याबाबत मंत्रिपरिषदेच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना आणि गेल्या 5 वर्षातील कामगिरीवर चर्चा करण्यात आली.
विकसित भारत 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चायावेळी मंत्रिपरिषदेने विकसित भारत 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंट आणि पुढील 5 वर्षांच्या सविस्तर कृती आराखड्यावर चर्चा केली. यासह, मे 2024 मध्ये नवीन सरकारच्या स्थापनेनंतर त्वरित अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यासाठी 100 दिवसांचा अजेंडा तयार करण्यात आला. विकसित भारताचा रोडमॅप हा 2 वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. यामध्ये सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक संस्थांशी व्यापक सल्लामसलत आणि तरुणांना त्यांची मते, सूचना आणि इनपुट जाणून घेण्यासाठी एकत्रित करणे यांचा समावेश असलेल्या संपूर्ण-सरकारी दृष्टिकोनाचा समावेश होता.