केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:22 PM2024-06-04T19:22:42+5:302024-06-04T19:23:18+5:30
Lok Sabha Election Result 2024: त्रिशूर लोकसभा जागेवर भाजपच्या सुरेश गोपी यांचा दणदणीत विजय झाला.
Lok Saha Election Result 2024: यंदाची लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक ठरली आहे. मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आलेला नाही. विशेष म्हणजे, देशभरात विविध ठिकाणी अनेक चकीत करणारे निकाल लागले. जिथे भाजपला विजयाची अपेक्षा होती, तिथे पराभव झाला. तर, जिथे पराभवाची अपेक्षा होती, तिथे विजय झाला. अशाच जागांपैकी केरळचा त्रिशुर मतदारसंघदेखील आहे.
केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह इतिहासात पहिल्यांदाच केरळमध्ये भाजपने आपले खाते उघडले आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74689 मतांनी पराभव केला आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांना 4 लाख 12 हजार 338 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार व्हीएस सुनील कुमार यांना 3 लाख 37 हजार 652 मते मिळाली आहेत. तसेच, काँग्रेसचे मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 3,28,124 मते मिळाली. भाजपने एक जागा जिंकली असली तरी, राज्यात काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत 20 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. तर, सीपीएम दोन जागांवर तर आययूएमएल दोन जागांवर आघाडीवर आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांचा पराभव झालेला
त्रिशूर लोकसभा जागेवरील सुरेश गोपी यांचा हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरेश गोपी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशूरमधून पराभव झाला होता. तसेच, केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते शशी थरूर आणि भाजपचे राजीव चंद्रशेखर यांच्यात चुरशीची लढत झाली. विद्यमान खासदार थरूर यांचा अवघ्या 16 हजार मतांनी विजय झाला आहे.