"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:28 PM2024-06-04T20:28:06+5:302024-06-04T20:28:28+5:30
Lok Sabha Election Result 2024: "एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल आभार."
Lok Saha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आला नाही, तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएला 290+ जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया आघाडीनेही 230+ जागा मिळवल्या आहेत. भाजपला एकट्याने बहुमत गाठला आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करता येईल. दरम्यान, आजच्या निकालांवर गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
जनतेचा विश्वास मोदींवर- अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निकालानंतर आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ''एनडीएचा हा विजय म्हणजे देशासाठी आयुष्य खपवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांच्या अढळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनवर जनतेचा हा विश्वास आहे. हा सार्वजनिक आशीर्वाद म्हणजे मोदीजींच्या गरीब कल्याण, वारशाचे पुनरुज्जीवन, महिलांचा स्वाभिमान आणि शेतकरी कल्याणाच्या कामाच्या यशाचा आशीर्वाद आहे. या जनादेशासह विकासाच्या प्रवासाला अधिक गती आणि बळ देण्यासाठी न्यू इंडिया तयार आहे," असे शाह म्हणाले.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में NDA को लगातार तीसरी बार सेवा का मौका देने के लिए देश की जनता को कोटि-कोटि नमन करता हूँ।
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 4, 2024
लगातार तीसरी जीत ने यह स्पष्ट कर दिया है कि जनता का विश्वास सिर्फ और सिर्फ मोदी जी के साथ है।
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "देशातील गरीब, महिला, मागास, वंचित आणि तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी मोदीजींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रयत्नांसाठी एनडीएचा हा विजय म्हणजे जनतेचा आशीर्वाद आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. हा विजय मोदीजींच्या अखंड भक्तीचा परिणाम आहे. स्वतःची पर्वा न करता आणि केवळ देश आणि देशवासियांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस काम करत असलेल्या मोदीजींच्या मॅरेथॉन प्रयत्नांचा हा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल मी देशातील जनतेला सलाम करतो. सलग तिसऱ्या विजयाने जनतेचा विश्वास फक्त मोदींवर असल्याचे स्पष्ट झाले आहे," असे शाह म्हणाले.
निकालानंतर पंतप्रधानांचे पहिले ट्विट
निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करुन जनतेचे आभार मानले. ''देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो," असे मोदी म्हणाले.