ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - घराणेशाहीने जनसामान्यांच्या आशा-आकांक्षा धुळीस मिळवल्या आहेत असे सांगत पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घराणेशाहीला विरोध दर्शवला होता. एवढेच नव्हे तर 'ज्याची लायकी असेल त्याला (निवडणुकीसाठी) तिकीट मिळेल, त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये' असा स्पष्ट इशाराही मोदींनी दिला होता. मात्र 'पार्टी विथ डिफरन्स' असा तोरा मिरवणारा भाजपाही इतर पक्षांप्रमाणेच असल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधानांच्या स्पष्ट इशा-यानंतरही उत्तर प्रदेश निवडणुकीत नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपातही 'घराणेशाही' असल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १५५ उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह याच्या नावाचा समावेश आहे. पंकजला नोएडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान आमदार विमला बोथम यांचा पत्ता कट झाला आहे. तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू सिद्धार्थ नाथ सिंग हे अलाहबाद पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.
(लायकी असेल तरच मिळेल तिकीट - पंतप्रधानांचा स्वपक्षीयांना इशारा)